भावनिक ऐक्य जपण्याचे महाराष्ट्रासमोर मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 09:30 PM2016-04-27T21:30:43+5:302016-04-28T00:22:36+5:30

प्रकाश पवार : स्वतंत्र विदर्भाची शक्यता कमी

Great challenge before Maharashtra to maintain emotional unity | भावनिक ऐक्य जपण्याचे महाराष्ट्रासमोर मोठे आव्हान

भावनिक ऐक्य जपण्याचे महाराष्ट्रासमोर मोठे आव्हान

Next

महाराष्ट्र दिन रविवारी (दि. १ मे) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची वाटचाल, आव्हाने, संधी आणि स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आदींबाबत राजकीय अभ्यासक व शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : महाराष्ट्राच्या वाटचालीबाबत काय सांगाल?
उत्तर : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झालेल्या लोकांना असे वाटले होते की, महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात भावनिक ऐक्य निर्माण होईल. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे एकजीव होतील. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान असलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. काळाच्या ओघात भावनिक ऐक्य नीट झाले नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण हे प्रत्येक विभाग एकमेकांचे स्पर्धक म्हणून पुढे आले. या विभागात महाराष्ट्रीयन समाजाऐवजी ‘प्रादेशिक समाज’ अशी संकल्पना घडली. त्यामुळे येथे लोकांची ओळख प्रदेशवाचक स्वरूपात व्यक्त होते. विभागनिहाय ओळख मुजली नाही, ती अधिक तीव्र झाली. त्यामुळे अधोगतीच्या दिशेने आपली पावले पडली. प्रगती म्हणजे विकास नव्हे, तर आपली उत्क्रांती आहे. त्यानुसार पाहता महाराष्ट्राच्या वाटचालीतील उत्क्रांतीचा आलेख खाली आहे.
प्रश्न : विकासाबाबत राज्याची स्थिती कशी आहे?
उत्तर : महाराष्ट्रात पहिल्यापासून औद्योगिक विकास होत गेला आहे. राज्याचा विकास हा मुंबई केंद्रित झाला आहे. मुंबई-ठाणे, रायगड-नाशिक आणि पुणे असा विकासाचा त्रिकोण राहिला आहे. उर्वरित महाराष्ट्राचा फारसा औद्योगिक विकास झालेला नाही. विकासाबाबत हा प्रांत मागास झाला आहे. सेवा-व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यातील व्यापारी वृत्तीचा विकास झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा अमराठी लोकांचा जास्त पुढाकार आहे. शेतीबद्दल महाराष्ट्राची सन १९६०-७० दरम्यान प्रगती झाली. पुढे हरितक्रांती, धवलक्रांती अशा विविध क्रांती झाल्याच्या कल्पना केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील शेतीचा विकास झालेला नाही. याचे पहिले कारण म्हणजे राज्यात उपलब्ध असलेले कमी पाणी, दुसरे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील अर्धा भाग अवर्षण प्रवण आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा हा शेतीबाबत अर्धा मागास आहे. हे चित्र पश्चिम महाराष्ट्राचे आहे. विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती यापेक्षा तीव्र आहे. त्यामुळे जायकवाडी, उजनी धरणांचे पाणी मराठवाड्याला हवे आहे. ‘मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र’ असा प्रश्न उभा राहिलेला आहे. विकासाबाबत राज्याचे चित्र फारसे समाधानकारक नाही.
प्रश्न : साहित्य-संस्कृती, कामगार चळवळीचे स्थिती कशी आहे?
उत्तर : राज्यात औद्योगिकरण, खासगीकरणानंतर कामगार चळवळीचा ऱ्हास झाला. कामगार चळवळ सध्या असंघटित स्वरूपात आहे. कामगार हे डाव्या विचारांकडून उजव्या विचारांकडे वळले आहेत. त्यामुळे चळवळीच्यामार्फत समस्या सोडविणे आणि विकास साधणे यात पुढाकार घेत नाही, असे राज्याचे चित्र झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी राजकारणी लोक हे राजकारणकर्मी व साहित्यकर्मी होते. त्याचे उदाहरण म्हणजे लेखक व राजकीय नेते असलेले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत. राज्याच्या स्थापनेनंतर राजकारणकर्मी व साहित्यकर्मी ही नावे वेगवेगळे होत गेली. सध्या साहित्यिक लोक आणि राजकारणी यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील साहित्य व संस्कृतीचा दबदबा कमी झाला आहे. महाराष्ट्रात आत्मचिकित्सा करणे, त्याबद्दल आदर ठेवणे हे लोकांच्या अंगवळणी पडले होते तसा समाज घडला होता. आता असे दिसते की, तुम्ही कोणाचीही चिकित्सा करू शकत नाही. स्वतंत्रपणे मत मांडू शकत नाही. मांडल्यास त्याचे परिणाम तेवढेच तीक्ष्ण असतात. हा राज्याच्या साहित्य-संस्कृती मनात झालेला बदल आहे.
प्रश्न : राज्यासमोरील आव्हाने आणि संधी कोणत्या आहेत?
उत्तर : मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यात भावनिक ऐक्य निर्माण करणे हे आपल्या राज्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यासह साधन संपत्तीच्या वितरणामध्ये समानता आणणे. कारण, समन्यायी पाणी वाटप हा राज्यातील यक्षप्रश्न आहे. अर्थसंकल्पात समन्यायी निधीचे वाटप महत्त्वाचे आहे. कायद्याचे राज्य आवश्यक आहे. कारण, राज्यात आता कायदा मोडणे हे अंगवळणी पडले आहे. त्याबद्दल कोणालाच भीती वाटत नाही. त्यामुळे असे जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये एका अर्थाने स्वैराचाराचे वर्तन वाढले आहे. या वर्तनाचा परिणाम अर्थकारणाशी संबंधित आला आहे. त्यात भ्रष्टाचार, वाळूमाफीया, कोणत्याही गोष्टीला कितीही शुल्क आकारणे आदींचा समावेश होतो. नोकरशाहीदेखील पांढरा हत्ती पोसल्यासारखी आहे. त्यातून कायद्याचे राज्य दुबळे झाले असून त्याच्या सक्षमीकरणाचे आव्हान राज्यासमोर आहे. कोकण किनारा, बंधाऱ्यांच्या विकासाची राज्याला मोठी संधी आहे. मात्र, यासाठी संरचनात्मक विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महाराष्ट्रात जेवढा पाऊस पडतो, त्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविला पाहिजे. मुंबई ही राज्याच्या विकासासाठी देणगी आहे. या मुंबईचे स्वरूप बहुभाषिक, सांस्कृतिक आहे ते जपले पाहिजे. महाराष्ट्र एकूण बहुल आहे. त्याचे बहुलपण हे एक आश्चर्य असून, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्रश्न : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याबाबत काय सांगाल?
उत्तर : स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना व्हावयाची असल्यास संघटन होणे आवश्यक आहे. स्वतंत्र विदर्भ चळवळीला लोकांचा संघटनात्मक पाठिंबा नाही, तसेच विदर्भ ही कल्पनादेखील स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर दोन गटांत विभागली जात आहे. त्यात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असा फरक पडतो तसेच शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध होतो. त्यामुळे मागणी ही एकसंध नाही, शिवाय यात दोन गट आहेत. त्यामुळे भाजप सत्तेत असतानाच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होईल याची शक्यता कमी आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा स्वतंत्र विदर्भाच्या स्थापनेस पाठिंबा आहे. मात्र, हा पाठिंबा या पक्षांना पश्चिम विदर्भात धोकादायक ठरणार आहे. त्याचे आत्मभान सर्वच पक्षांना आहे. त्यामुळे श्रीहरी अणे यांनी आंदोलन उभे केले असले तरी, भाजप सरकारकडून त्यांच्या सत्तेच्या अखेरच्या दोन वर्षांत विदर्भ राज्याच्या स्थापनेचा विचार केला जाणार नाही.
- संतोष मिठारी

Web Title: Great challenge before Maharashtra to maintain emotional unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.