महाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:47+5:302021-05-01T04:22:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान खूप मोठे व महत्त्वाचे आहे. राज्य सरकार कामगारांच्या सुरक्षेला, आरोग्याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान खूप मोठे व महत्त्वाचे आहे. राज्य सरकार कामगारांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि एकंदरच सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन विविध कायदे कामगारांच्या हितासाठी राबवित आहे. यापुढील काळातही महाराष्ट्रात कामगारांचे हक्क आणि त्यांचे हित अबाधित ठेवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आज, शनिवारी कामगार दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली. कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कामगार विभागाने वेळोवेळी सक्रिय भूमिका घेतली आहे. उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभाग एकत्रित आल्याने महाराष्ट्रातील वाटचाल आता प्रगतीकडे होणार हे नक्की आहे. कोरोनाच्या संकटातून संधी निर्माण करत सरकार महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा कायम राखेल. कामगारांची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्यासाठी कामगार विभाग प्रयत्न करीत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोविड विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, असे करीत असताना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना या निर्बंधांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे १ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी
मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १३ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांना मदतीसाठी भरीव तरतूद केली आहे.
कामगारांसाठी भोजन व्यवस्था कार्यान्वित..
कोरोनाविरोधातील लढ्यात कामगार संघटनांनी राज्य सरकारला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कारखान्यामार्फत लसीकरणाची माेहीम राबवण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
१३ लाख कामगारांना प्रत्येकी दीड हजाराचे अर्थसाहाय्य
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे. आतापर्यंत २ लाख १७ हजार कामगारांच्या खात्यावर १३७ कोटी ६१ लाख रूपये जमा केले असून कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित केले जाते, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.