फुटबॉल चाहत्यांची घोर निराशा, अर्जेंटिना, पोर्तुगाल बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:04 AM2018-07-02T01:04:45+5:302018-07-02T01:04:49+5:30
कोल्हापूर : रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा मेस्सी आणि पोर्तुगालचा रोनॉल्डो या दोन स्टार खेळाडूंची जादू चालली नाही. त्यामुळे या दोन्ही संघांचा पराभव या दोन खेळाडूंच्या चाहत्यांच्या मनाला पटला नाही. मात्र, दोन्ही संघही स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे या चाहत्यांची घोर निराशा झाली. अनेकांना नाराजी लपविता आली नाही.
अर्जेंटिनाचा मेस्सी, पोर्तुगालचा आघाडीवीर रोनॉल्डो ख्रिस्तिनो, ब्राझीलचा नेमार यांचा चाहता वर्ग कोल्हापूरच्या पेठापेठांमध्येही आहे. यात शनिवारी (दि. ३०) अर्जेंटिनाचा फ्रान्सने ४-३ असा पराभव केला. यात लिओनिल मेस्सीला एकही गोल नोंदवता आला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत मेस्सी जादू करील आणि अर्जेंटिना बरोबरी साधेल असा कयास होता. मात्र, शेवटपर्यंत काही बरोबरी झाली नाही. यासह पोर्तुगालवरही उरुग्वेने २-१ अशी मात केली. यातही स्टार खेळाडू रोनॉल्डोला करिश्मा करता आला नाही. त्यामुळे जगभरासह कोल्हापुरातील तमाम चाहता वर्गही नाराज झाला; कारण गेल्या दोन महिन्यांपासून या दोन खेळाडूंची छायाचित्रे कोल्हापुरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर, आदी फुटबॉल खेळणाऱ्या संघांच्या समर्थकांकडून पोस्टररूपाने सर्वत्र झळकत होती. त्यामुळे अगदी टिपेला पोहोचलेला विश्वचषक फुटबॉलचा ज्वर अशा रीतीने उतरेल असे वाटले नव्हते. यात जादूई खेळी पाहण्यास मिळेल ही चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, या स्टार खेळाडूंनी घोर निराशा केली. आता ब्राझीलच्या नेमारच्या खेळीकडे सर्व कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारच्या हाय व्होल्टेज सामन्यात चाहत्या देशांचे आव्हान संपुष्टात आल्याने त्याची चर्चा रविवारी दिवसभर या चाहत्या मंडळींत होती. सोशल मीडियाद्वारे मेस्सी, रोनॉल्डो कसे चुकले, कोणत्या प्रतिस्पर्धी खेळाडूने त्यांना कसे रोखले याबद्दलची चर्चा दिवसभर रंगली होती. आता स्पर्धेतील ब्राझील, उरुग्वे, फ्रान्स यांच्यातील खेळाडूंकडे कोल्हापूरकर चाहते वळले आहेत.