सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या भक्तांना एस.टी.कडून भरघोस सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:38 AM2019-11-19T09:38:21+5:302019-11-19T09:40:15+5:30
दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे रेणुकादेवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सौंदत्ती यात्रेसाठी जातात. तीन वर्षांपूवी खासगी वाहतूक व कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसला भाविक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात असे,
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक व आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा यंदा १२ डिसेंबरला होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून जाणा-या भाविक-प्रवाशांना एस. टी. महामंडळाकडून प्रासंगिक कराराचा दर ५० रुपयांवरून ३४ रुपये, तर खोळंबा आकार ९८ रुपयांवरून केवळ १० रुपये इतका नाममात्र करण्यात आल्याचे एस. टी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.
दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे रेणुकादेवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सौंदत्ती यात्रेसाठी जातात. तीन वर्षांपूवी खासगी वाहतूक व कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसला भाविक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात असे, परंतु रेणुका भक्त मंडळाच्या शिष्टमंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याकडे प्रासंगिक कराराचे दर व खोळंबा आकार कमी करावा, अशी मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्राच्या एस.टी. बसेसचा प्रासंगिक कराराचा दर तब्बल ५० रुपयांवरून ३४ रुपये व खोळंबा आकार ९८ रुपयांवरून केवळ १० रुपये करण्याचे निर्देश देओल यांनी वाहतूक विभागाला दिले.
त्यासंबंधीचे परिपत्रक महामंडळाच्या मुख्यालयातून कोल्हापूर विभागाला पाठविण्यात आले असून, पुढील वर्षी माघ पौर्णिमेला भरणा-या सौंदत्ती यात्रेलादेखील ही सवलत लागू राहील, असे एस. टी. महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.