‘रोटरी’कडून नाममात्र किमतीत उत्तम आरोग्य सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:43+5:302021-03-10T04:24:43+5:30
कोल्हापूर : रक्तापासून ते अत्याधुनिक हायड्रो थेरपीपर्यंतच्या सुविधा नाममात्र किमतीत एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे मानव सेवेचे मंदिर ...
कोल्हापूर : रक्तापासून ते अत्याधुनिक हायड्रो थेरपीपर्यंतच्या सुविधा नाममात्र किमतीत एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे मानव सेवेचे मंदिर नूतनीकरणानंतर आजपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत नव्या दमाने अत्याधुनिक इमारतीसह दाखल होत आहे. समाजसेवेची सुवर्णमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलने अमेरिकेतील शिकागो रोटरी क्लबच्या धर्तीवर नागाळा पार्कात उभारलेल्या या इमारतीचे ऑनलाइन उद्घाटन सायंकाळी पाच वाजता रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट शेखर मेहता व जिल्हा प्रेसिडेंट संग्राम पाटील यांच्या हस्ते होत असल्याची माहिती व्ही. एन. देशपांडे यांनी दिली.
स्थापनेचे ५२ वे वर्ष साजरे करणाऱ्या कोल्हापूर रोटरी इंटरनॅशनलच्या समाजसेवा केंद्राचे नूतनीकरण झाले आहे. रोटरीरियनच्या ६ कोटी रुपयांच्या वर्गणीतून चार मजली अत्याधुनिक इमारत खानविलकर पेट्रोलपंपाजवळ साकारली आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित आणि उपचारासाठी येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेऊनच बांधण्यात आली आहे. इमारतीच्या चार बाजूच्या बीमवर भार देऊन बांधकाम केलेली पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच इमारत आहे. बैठकीला रोटरियन अरुणकुमार गोयंका, नितीन गुंदेशा, नितीन वाडीकर, बाबाभाई वसा, राजू पारीख, प्रताप पुराणिक, सुभाष मालू, गिरीश जोशी, राजेंद्र देशिंगे, अविनाश रास्ते, इंद्रजित नागेशकर, हेमंत कुलकर्णी, आसिफ तहसीलदार, अमित माटे, अरविंद कृष्णन, सिद्धार्थ पाटणकर उपस्थित होते.
चौकट ०१
या असतील सुविधा..
प्लाझ्मा विलगीकरणासह ब्लड बँक, शस्त्रक्रियेपश्चात लागणारी फिजिओथेरपी, स्वीमिंग पूल, स्पा, व्हॅक्सिन, स्पीच, हेअरिंग थेरपी, हायड्रो थेरपी, जिम अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
चौकट ०२
ना नफा ना तोटा तत्त्वावर सुविधा
रोटरीच्या या समाजसेवा केंद्रामध्ये ना नफा ना तोटा या तत्त्वावर सेवा दिल्या जातील. सकाळी ९ ते ७ या वेळेत कुणीही संपर्क साधून अत्यल्प किमतीत या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. यासाठी कोणत्याही वशिलेबाजीची, कोणी बड्या व्यक्तीच्या पत्राची गरज भासणार नाही. आर्थिक दुर्बल घटकांना माेफत सेवा देण्याचीही सोय आहे.
चौकट ०२
नवे तंत्रज्ञान
अमेरिकेतील शिकोगो या शहरात रोटरी इंटरनॅशनलची १८ मजली इमारत आहे. कोल्हापुरात याच धर्तीवर उभारलेली ही इमारत चार मजली आहे. भविष्यात याचा वापर वाढेल तसे मजले वाढवण्याची सुविधा आहे. रोटरीची सामाजिक बांधीलकी सर्वश्रुत आहेच, पण आरोग्याच्या महत्त्वपूर्ण सुविधा माफक किमतीत देण्यासाठी स्वखर्चाने बांधलेली अशा प्रकारची ही पहिलीच इमारत आहे.
फोटो: ०९०३२०२१-कोल-रोटरी बिल्डिग