महायुतीवर शिक्कामोर्तब
By Admin | Published: October 6, 2015 11:14 PM2015-10-06T23:14:55+5:302015-10-06T23:45:08+5:30
वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसला रोखण्यासाठी सहकार्य घेण्याची तयारी
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयने महायुतीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार शिवसेना ८, भाजप ८ आणि आरपीआय १ या फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी व्यापारी व नगरविकास आघाडीला सामावून घेण्याची महायुतीची तयारी आहे, अशी माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, आरपीआय तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, शिवसेना तालुका संघटक नंदू शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे म्हणाले, शिवसेना, भाजप, आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून महायुतीच्या जागावाटपाचा एकमुखी निर्णय घेतला आहे. कोणी कोणत्या प्रभागात लढायचे हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्यापारी तसेच नगरविकास आघाडी व काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नसणाऱ्या व सक्षम उमेदवार देवू शकणाऱ्या अन्य कोणत्याही पक्षाची आमच्यासोबत येण्याची तयारी असेल तर त्यांना आम्ही सामावून घेऊ, असे रावराणे द्वयींनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी फक्त काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी गेल्या पन्नास वर्षात सत्ता उपभोगून शहराची आणि गावाची पुरती वाट लावली आहे. वाभवे-वैभववाडीची अवस्था कणकवली, मालवणसारखी आम्हाला होऊ द्यायची नाही. त्यामुळे पन्नास वर्षात काहीही करू न शकलेले पुन्हा सत्तेत येवून वेगळे काय करणार आहेत? असा सवाल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.(प्रतिनिधी)
गावाला स्मशानभूमीसुद्धा नाही
काँग्रेसच्या अधिपत्याखाली इतकी वर्षे वाभवे-वैभववाडीचा कारभार सुरू होता. मात्र, करोडो रुपयांचा चुराडा करूनही शहरासह गावाला बारमाही पुरेसे पिण्याचे पाणी ते देवू शकत नाहीत. गावासाठी हक्काची स्मशानभूमी निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्या हातात नगरपंचायत देवून लोकांचा फायदा काय? शहरात अनैतिक धंदे करणारे पदाधिकारी कोणाचे आहे, असे प्रश्न महायुतीतर्फे उपस्थित करण्यात आले.
उपक्रमांचा दिखाऊपणा
वाभवे-वैभववाडी शहरात तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तालुका सुरक्षित राहणार आहे का? मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या वायफाय सेवेचा लाभ नगरपंचायतीच्या १७ पैकी किती प्रभागात मिळतो? आणि त्या सेवेची सध्याची स्थिती काय आहे असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी राबविलेले उपक्रम आमच्यासाठी आता फायदेशीर ठरत आहेत, असे जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे यांनी सांगितले.