हिरवागार काेबी दहाला दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:15+5:302021-09-06T04:27:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. हिरवागार कोबी दहा रुपयांना दोन मिळत असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. हिरवागार कोबी दहा रुपयांना दोन मिळत असून टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, दोडक्याचे दरही तुलनात्मक कमी आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सुकामेवा, गहू, गुळाला मागणी वाढली आहे.
महापुरानंतर भाजीपाल्याची आवक पूर्वपदावर आली आहे. आवक वाढल्याने दरात मोठी घसरण पाहावयास मिळत आहे. घाऊक बाजारात कोबीची विक्री तर मातीमोल दराने होत आहे. हिरवागार किलोचा कोबी पाच रुपयाला मिळत आहे. वांग्याच्या दरात तर इतकी घसरण कधीच नव्हती. ऐन हंगामातही २० रुपये किलोपर्यंत दर राहतो. मात्र पावसाळ्यात पंधरा रुपयांपर्यंत दर आला आहे. टोमॅटोच्या दरातील घसरण कायमच आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये दर बऱ्यापैकी आहे. घेवडा, गवार, कारली, भेंडी, दोडक्याची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पावसाळी काकडीची आवकही चांगली आहे. कोथिंबीर किरकोळ बाजारात दहा रुपये, तर घाऊकमध्ये ३ रुपये पेंडी आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, पोकळ्याचा दर सरासरी पाच रुपये पेंडी आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडधान्य मार्केटमध्ये रेलचेल दिसत आहे. गूळ, खिरीचे गहू, सुक्यामेव्याची मागणी वाढली आहे. खिरीचे गहू १२० रुपये किलो, तर गूळ ४५ रुपये किलो आहे. मिक्स सुकामेवा ५०० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात साखर ४० रुपये किलो आहे. तूरडाळ, हरभरा डाळ, मूग, मूगडाळीचे दर स्थिर आहेत. गोडेतेलाच्या दरातही फारशी चढ-उतार दिसत नाही. नारळाची मागणी वाढली असून १२ ते २० रुपये नग आहे.
फळ मार्केटमध्ये सफरचंद, चिक्कू, डाळिंब, केळीची आवक तुलनेत जास्त आहे. सफरचंद ३० ते १०० रुपये किलो आहेत, तर चिक्कू २० ते ४० रुपये किलो आहेत.
घाऊकमध्ये ढबू ३ रुपये किलो
एरवी ४० पासून ८० रुपये किलोपर्यंत असणाऱ्या ढबूच्या दरात या आठवड्यात कमालीची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ३ ते सहा रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. बाजार समितीत रोज ५९५ हून अधिक ढबू पोत्यांची आवक होत आहे.
बदामाचे दर हळूहळू पूर्वपदावर
अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे बदामाच्या दरात मोठी वाढ झाली होती. ११०० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला होता. मात्र या आठवड्यापासून दर हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. आता ८५० रुपये किलो दर आहे.
फोटो ओळी :
भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून हिरवागार कोबी पाच रुपयाला मिळत आहे. चिक्कूची आवकही वाढली आहे.
(फोटो-०५०९२०२१-कोल-बाजार व बाजार०१) (छाया- नसीर अत्तार)