कोल्हापूर-कटिहार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, पहिल्याच रेल्वेला प्रवाशांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:55 IST2025-04-07T11:55:28+5:302025-04-07T11:55:49+5:30
पुढच्या तिन्ही गाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोल्हापूर-कटिहार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, पहिल्याच रेल्वेला प्रवाशांची गर्दी
कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मध्य रेल्वेच्याकोल्हापूर-कटिहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसला रविवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून उद्योजक हरीश जैन यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडी सोडण्यात आली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना कोल्हापूर ते कटिहार क्रमांक (गाडी क्रमांक ०१४०५/०१४०६) ही साप्ताहिक विशेष रेल्वे सोयीची आहे. या आठवड्यासाठी ही गाडी हाउसफुल्ल झाली आहे.
कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव, स्थानकप्रमुख आर. के. मेहता, रेल्वे प्रवासी संघटनेचे समन्वयक अनिल तराळ, प्रशांत चौगुले, जितेश कारेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
तत्पूर्वी रेल्वेच्या इंजिनला हार घालून मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. यावेळी या रेल्वे गाडीचे सारथ्य करणारे कोल्हापूरचे सुपुत्र मिलिंद उलपे यांचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत हा मुद्दा उपस्थित करून खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
चार फेऱ्या होणार, सर्वांचे आरक्षण फुल्ल..
कोल्हापुरी–कटिहार व कटिहार–कोल्हापूर या मार्गावर प्रत्येक चार फेऱ्या होणार आहेत. ही गाडी सांगली, पुणे, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारस, जबलपूर, प्रयागराज छावकी, अयोध्या जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बेगुसराय या प्रमुख स्टेशनवर थांबणार आहे. यामुळे कोल्हापुरातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. या गाडीच्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल झाले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद बघता या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सोडण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.