मिरज-सोलापूर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
By admin | Published: March 19, 2017 12:35 AM2017-03-19T00:35:34+5:302017-03-19T00:35:34+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मिरज-सोलापूर एक्स्प्रेसचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात शनिवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मिरज-सोलापूर एक्स्प्रेसचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. महापौर हारूण शिकलगार, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दादा भोय, वाणिज्य व्यवस्थापक कृष्णांत पाटील, रेल्वे सल्लागार समितीचे दीपक शिंदे, शिवनाथ बियाणी यांनी हिरवा झेंडा दाखवून सोलापूर एक्स्प्रेस रवाना केली. खा. राजू शेट्टी याप्रसंगी उपस्थित होते.
गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या मिरज-सोलापूर हंगामी पॅसेंजरला रेल्वे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सोलापूर पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा देऊन सोलापूर एक्स्प्रेस नियमित सुरू करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दुपारी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवून या एक्स्प्रेसचे उद्घाटन केले.
यावेळी खा. राजू शेट्टी म्हणाले की, लोकप्रतिनिधी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या सूचनांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. लोकप्रतिनिधींच्या सूचनांना केराची टोपली दाखविण्याची रेल्वे अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. कोल्हापूर-वैभववाडी नवीन रेल्वे मार्गासाठी यापूर्वी रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मात्र कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला मान्यता देऊन काम सुरू केले. मिरज-सोलापूर एक्स्प्रेस व मिरज-पुणे दुहेरीकरणामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे व्यवस्थापक दादा भोय यांनी सांगितले.
रेल्वे सल्लागार समितीचे दीपक शिंदे, शिवनाथ बियाणी यांचेही भाषण झाले. मिरज स्थानक व्यवस्थापक एस. व्ही. रमेश यांनी स्वागत केले. प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील, ज्ञानेश्वर पोतदार, सुधीर गोखले यावेळी उपस्थित होते.
मिरज रेल्वे स्थानकात शनिवारी महापौर हारूण शिकलगार, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दादा भोय, दीपक शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून मिरज-सोलापूर एक्स्प्रेस रवाना केली.