मंडलिक यांच्यामुळे कागलला हरितक्रांती
By admin | Published: April 27, 2017 12:02 AM2017-04-27T00:02:38+5:302017-04-27T00:02:38+5:30
संजय घाटगे : बेनिक्रेतील पाणी पूजन, कृतज्ञता सोहळा उत्साहात
म्हाकवे : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या आणि परिवर्तन घडविण्याची ताकद केवळ पाणी योजनेत आहे. कागलमधील इंच-इंच जमीन बागायती व्हावी हे ध्येय असणाऱ्या दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यकर्तृत्वाचे उपकार कागलमधील जनता कधीच विसरणार नाही. बेनिक्रेतील शेतकऱ्यांची जमिनी गहाण ठेवून कर्जे घेतली असली तरी या कर्जाला थकहमी हमीदवाडा कारखान्याच्या माध्यमातून कै. मंडलिकांनी घेतल्यामुळे मंडलिकांचे फार मोठे योगदान येथील शेतकऱ्यांना मिळाले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.
बेनिक्रे (ता. कागल) येथील ज्योतिर्लिंग पाणी वापर योजना व येथील शेतकऱ्यांनी वेदगंगा नदीतून केलेल्या पाणी योजनेच्या पाणी पूजन व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो वाडकर होते.
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पूर्वी कागल तालुका शापित मानला जात होता. मात्र, योगायोगाने तीन नद्यांचा उष:शापही मिळाला असून, पाटगाव, काळम्मावाडी, चिकोत्रा धरणेही उशाला आहेत हे आपले भाग्य आहे. बेनिक्रेतील गावकऱ्यांनी एकसंधपणे प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्यामुळे आज त्याची फलश्रुती आली
आहे.
‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिक्षण व अर्थ सभापती अंबरीश घाटगे, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता एस. एल. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब घुणकीकर, बापू फेगडे, आण्णासो वाडकर, आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या शिवानी भोसले, सभापती कमल पाटील. पं. स. सदस्य विश्वास कुराडे, विजय भोसले, डी. बी. धारवाडकर, यु. एम. कापशे, बँक आॅफ इंडियाचे उदयकुमार मल्ल, उपसरपंच सरिता वसंत चौगुले, सुनील काळूगडे, सखाराम जाधव, माजी सरपंच मारुती काळूगडे, आदी उपस्थितीत होते. संस्थेचे सचिव रवींद्र वाडकर यांनी आभार मानले.
अन् नेते आले एका व्यासपीठावर
एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४५० शेतकऱ्यांनी ‘वज्रमूठ’ बांधून स्वबळावर सुमारे ३० फूट उंचीचा डोंगराचा अडसर पार करून वेदगंगा नदीतून पाणी योजना साकारणाऱ्या बेनिक्रे (ता. कागल) येथील ‘त्या’ शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी कागल तालुक्यातील राजकीय गट-तट विसरून नेते मंडळींसह अनेक कार्यकर्ते या योजनेच्या पाणी पूजन कार्यक्रमासाठी दाखल झाले होते.
‘शाहू’मार्फत आता सौरपंपाला
अनुदान : समरजितसिंह घाटगे
बेनिक्रेतील शेतकऱ्यांचा हा पथदर्शी प्रयोग राज्याला मार्गदर्शक ठरणार आहे. पाणी योजनेच्या फलश्रुतीनंतर आता सर्वच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती, ठिबकचा वापर आणि सौर ऊर्जावर आधारित विद्युत पंप वापराकडे वळावे, किंबहुना यामुळे पैशाची बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. भविष्यात या तिन्ही गोष्टीला ‘शाहू’ कारखान्यामार्फत भरीव अनुदानही देणार असल्याचे ‘शाहू’चे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केले.