चित्रांतून जॉन सिंगर सार्जंट यांना अभिवादन; महावीर गार्डनमधील निसर्गसौंदर्य चित्रबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:36 AM2020-01-13T10:36:51+5:302020-01-13T10:39:22+5:30
कोल्हापूर येथील महावीर गार्डनमधील निसर्गसौंदर्य रविवारी सकाळी विविध कलाकारांनी चित्रबद्ध केले. त्याद्वारे त्यांनी महान चित्रकार जॉन सिंगर सार्जंट यांना अभिवादन केले. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, पुणे येथील चित्रकार, छायाचित्रकार या उपक्रमात सहभागी झाले.
कोल्हापूर : येथील महावीर गार्डनमधील निसर्गसौंदर्य रविवारी सकाळी विविध कलाकारांनी चित्रबद्ध केले. त्याद्वारे त्यांनी महान चित्रकार जॉन सिंगर सार्जंट यांना अभिवादन केले. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, पुणे येथील चित्रकार, छायाचित्रकार या उपक्रमात सहभागी झाले.
जॉन सिंगर सार्जंट यांच्या १६४ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील चित्रकार संजय शेलार, ईनायत शिडवणकर यांच्यातर्फे आयोजित ‘निसर्गाच्या खुल्या वातावरण’(आऊट डोअर पेंटिंग) या उपक्रमाची सकाळी ८.३0 वाजता सुरुवात झाली. त्यामध्ये शेलार, शिडवणकर, रोहन कुंभार, मोहसीन मतवाल, महेश सौंदती, नंदकुमार पोतदार, महेश पांचाळ, राहुल रेपे, सिद्धार्थ गावडे, विलेशा कांबळे, संदीप कुंभार, सुरेश पोतदार, आदी कलाकार सहभागी झाले.
या चित्रकारांनी महावीर गार्डनमधील निसर्गसौंदर्य आणि व्यक्तींच्या छबी आपल्या कॅनव्हासवर साकारल्या. तैलरंग, जलरंग आणि अॅक्रेलिक रंगांतून त्यांनी कलाकृती साकारल्या. त्या पाहण्यासाठी कलारसिकांनी या ठिकाणी गर्दी केली. छायाचित्रकारांनी विविध क्षण कॅमेराबद्ध केले.
नवनिर्मितीची प्रेरणा
सध्याच्या धावपळीच्या व इंटरनेटच्या आभासी माध्यमाच्या जगात चित्रकारही बांधला गेला आहे. विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चित्रण करणे हे चित्रकाराच्या जडणघडणीसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यातून चित्रकाराचा सराव, अभ्यास, प्रगल्भता, क्षमता, सौंदर्य दृष्टिकोन वाढीस लागतो.
त्याला बळ देण्यासह नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘निसर्गाच्या खुल्या वातावरण’ हा उपक्रम आयोजित केला असल्याचे ईनायत शिडवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमात स्वत:चे चित्र साहित्य घेऊन चित्रकार सहभागी झाले. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम घेण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.