जल्लोषाऐवजी हुतात्म्यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:39 AM2018-11-30T00:39:31+5:302018-11-30T00:39:35+5:30
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत करून या यशाबद्दल सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्यासह ...
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत करून या यशाबद्दल सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात आत्मबलिदान करणाऱ्या ४२ हुतात्म्यांना दसरा चौकात अभिवादन करण्यात आले. सायंकाळी पणत्या प्रज्वलित करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, तर दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले सचिन तोडकर व मनीष महागावकर यांचे उपोषण मागे घेण्यात आले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, बाबा पार्टे, अॅड. शिवाजीराव राणे, नगरसेवक मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, स्वप्निल पार्टे, अनिल कदम, अजित राऊत, दिलीप सावंत, विनायक फाळके आदी उपस्थित होते.
यानंतर दसरा चौकात एकत्रितपणे आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले; परंतु जल्लोष न करता मराठा महासंघाचे संस्थापक स्वर्गीय आण्णासाहेब पाटील, कोपर्डी घटनेतील ताई व मराठा आंदोलनातील ४२ हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच सायंकाळी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर पणत्या प्रज्वलित करून हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, अवधूत पाटील, जयेश कदम, कमलाकर जगदाळे, अनिल कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, महादेव पाटील, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते.
इंद्रजित सावंत म्हणाले, आरक्षणाचा हा निर्णय स्वागतार्ह असून आंदोलकांचा ५० टक्के विजय आहे. ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण देण्याची मागणी होती.
वसंतराव मुळीक म्हणाले, सरकारने हौतात्म्य पत्करलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदतीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी.