मशाल मिरवणुकीने क्रांतिवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:39 AM2017-08-15T00:39:37+5:302017-08-15T00:39:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘भारत माता की जय...’, ‘वंदे मातरम्...’चा जयघोष, देशभक्तीपर गीते आणि धगधगती मशाल, अशा जोशपूर्ण, ऊर्जामय वातावरणात कोल्हापूरकरांनी सोमवारी सायंकाळी स्वातंत्र्य लढ्यातील शहीद, क्रांतिवीरांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलनातर्फे शहरातून मशाल मिरवणूक काढण्यात आली.
येथील हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित मशाल मिरवणुकीची सुरुवात मिरजकर तिकटी येथे सायंकाळी पावणेसात वाजता नगरसेवक विजय सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून करण्यात आली. देशभक्तीपर गीते, ‘भारत माता की जय...’, ‘वंदे मातरम्...’ ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात मिरवणूक मार्गक्रमण करीत होती. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, तटाकडील तालीम मार्गे निवृत्ती चौक येथे मिरवणूक पोहोचली. याठिकाणी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. याठिकाणी हेमंत आराध्ये, महेश जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, पांडुरंग यज्ञोपवती, आदींची भाषणे झाली. यावेळी शाहीर राजू राऊत, दिलीप सावंत, नगरसेवक संभाजी जाधव, किरण नकाते, सुनीता पाटील, बबिता जाधव, किशोरी स्वामी, गणेश देसाई, सुरेश जरग, आदी उपस्थित होते. राष्टÑगीताने मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
दरम्यान, हिंदू एकता आंदोलनातर्फे सायंकाळी सात वाजता संस्थेच्या कार्यालयापासून मशाल मिरवणुकीचा प्रारंभ झाला. येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लहू आण्णाप्पा कांबळे, प्रवचनकार बंडोपत देवकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी दीपक शेळके, लालासो गायकवाड, किशोर घाटगे, नंदकिशोर अहीर, शरद पवार, गणेश नारायणकर, सुवर्णा पोवार, रश्मी आडसुळे, सरोज फडके, शीतल पवार, रेखा दुधाणे, संजय कुलकर्णी, मनोहर सोरप, प्रसाद जाधव, आदी उपस्थित होते.
‘वंदे मातरम्’ने मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत ज्युदो खेळाडू, अबालवृद्ध सहभागी झाले होते.
चीन, पाकिस्तानचा निषेध
चीन, पाकिस्तानच्या ध्वजांची प्रतीकात्मक होळी करून मिरजकर तिकटी येथे संबंधित राष्ट्रांचा निषेध करण्यात आला. यावेळी चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार देखील करण्यात आला असल्याचे हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी सांगितले.