सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष होणार, आॅक्टोबरअखेर होणार घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:47 PM2018-09-10T18:47:34+5:302018-09-10T18:49:31+5:30
सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल.
कोल्हापूर : सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल. तत्पूर्वी समाजबांधवांची मते आजमावण्यासाठी बुधवारपासून कोल्हापुरातून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली जाईल, अशी माहिती मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील व माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सुरेश पाटील म्हणाले, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, याकरिता गेले २५ वर्षे विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष सुरू आहे; परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतलेली नाही.
५८ मूक मोर्चे काढूनही समाजाच्या पदरात काहीच पडलेले नाही; यामुळे मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यभर दौरा करून मराठा समाजबांधव व संघटनांशी चर्चा केली जाणार आहे. पक्षबांधणीची सुरुवात कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे उद्या, बुधवारी सकाळी ११.३० वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन होणार आहे.
सुरेश साळोखे म्हणाले, पक्ष स्थापन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. राज्यभर दौरा करून समाजबांधवांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. मराठा समाजातील नवी पिढी नक्कीच या पक्षासोबत राहील.
यावेळी बाळ घाटगे, राजू सावंत, परेश भोसले, भरत पाटील, वैशाली जाधव, राहुल इंगवले, सतीश पाटील, संतोष कांदेकर, आदी उपस्थित होते.
गणेश मंडळांनी मराठा आरक्षणाचा फलक लावावा
गणेशोत्सवात सर्व गणेश मंडळांनी मराठा आरक्षणाला पाठिंब्याचे फलक लावावे, जेणेकरून या आंदोलनाची धग कायम राहील, असे आवाहन सुरेश साळोखे यांनी केले.