यड्रावच्या जलस्रोताचे भूजल परीक्षण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:36+5:302021-03-22T04:21:36+5:30
घन:शाम कुंभार यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित ...
घन:शाम कुंभार
यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील भूजल परीक्षणाची गरज निर्माण झाली असून भविष्यात पाणी असूनही त्याचा वापर करता येणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते. याकरीता प्रदूषण नियंत्रण मंडळ व भूजल सर्वेक्षण विभागाने वेळीच लक्ष घालणे अत्यावश्यक आहे.
पार्वती औद्योगिक वसाहतीमधील काही ठिकाणच्या बोअरवेलमधील पाणी हे प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जलप्रदूषण गुणवत्ता अहवाल २०१९-२० मध्ये आहे. पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये मनपसंद टेक्स्टाईल, जुबिली प्रोसेस, बीडला प्रोसेस, इचलकरंजी टेक्सटाईल्स व बाहुबली प्रोसेस या उद्योगांमधून कापडावर प्रक्रिया करण्यात येते. त्यांच्या पाणी प्रक्रिया प्रकल्पातून शुद्धिकरण झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करत असल्याचा दावा संबंधितांकडून केला जातो.
प्रक्रिया झालेल्या पाण्याचा पुनर्वापर साडेचार एकर जागेत बांबू लागवडीसाठी व वसाहतीमध्ये लावलेल्या २५०० वृक्ष जतनासाठी केला जातो. औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २५० उद्योग सुरू आहेत. त्यापैकी अंदाजे १५० हून अधिक उद्योगांनी स्वत: कूपनलिका खोदल्या आहेत. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून पुनर्वापर तर कोरड्या विहिरी व बिनपाण्याच्या कुपनलिकांमध्ये सोडून सांडपाण्याची विल्हेवाटही लावण्याचे प्रयोग उद्योजकांकडून झाले आहेत तसेच या पाण्याचा वापर शेती, इतर कारणांसाठी केला गेला. या सर्व कारणांमुळे परिसरातील कुपनलिका, विहिरी प्रदूषित बनण्यास कारणीभूत ठरल्याने तेथील सांडपाण्याचे नमुने वेळोवेळी परीक्षणासाठी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिद्ध केले आहे. या उद्योगाच्या परिसरातील कुपनलिका व विहिरीतील पाण्याचे परीक्षण करून ते पाणी शेतीसाठी, व सजीवांना पिण्यासाठी योग्य आहे का, याची प्रयोगशाळेमधून सिद्धता करावी लागेल. अन्यथा पाणी आहे पण त्याचा कोणासही उपयोग नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
सांडपाण्याने परिसर दूषित
‘इचलकरंजीच्या टेक्स्टाईल’ उद्योगांमध्ये ‘ज्युबिली’ वर्षापासून कापडावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करून ‘बाहुबली’ बनलेल्या उद्योजकांनी परिसर दूषित केला आहे.
फोटो - २१०३२०२१-जेएवाय-०२, ०३-संग्रहित छायाचित्र