समरजितसिंह घाटगेंकडून गटाची पुनर्बांधणी जोरात

By admin | Published: January 28, 2017 01:18 AM2017-01-28T01:18:57+5:302017-01-28T01:18:57+5:30

अनेक मान्यवरांचा भाजप प्रवेश : नवा पर्याय देण्याचा प्रयत्न

Group reconstruction from Samarjit Singh Ghatgon loud | समरजितसिंह घाटगेंकडून गटाची पुनर्बांधणी जोरात

समरजितसिंह घाटगेंकडून गटाची पुनर्बांधणी जोरात

Next

कागल : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागल तालुक्यात १९८०च्या दशकात बलाढ्य असलेल्या राजे गटाचीही पुनर्बांधणी करीत असल्याचे पक्ष प्रवेश कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. खरे तर सध्या तालुक्याच्या राजकारणात ते अजून नवखेच आहेत. तरीही अनेक मान्यवर भाजपमध्ये पर्यायाने राजे गटात प्रवेश करीत असल्याने या गटाचे अस्तित्व आता ठळकपणे समोर येऊ लागले आहे.
मंडलिक-घाटगे या दोन राजकीय गटांत कागल तालुका विभागल्यानंतर येथील राजकारण कमालीचे टोकदार आणि संघर्षपूर्ण झाले होते. १९८० ते २००० पर्यंत २० वर्षे हा कट्टर राजकारणाचा कालखंड होता. त्यानंतर सुरुवातीला घाटगे गट, तर नंतर मंडलिक गटात उभी फूट पडून अनुक्रमे संजय घाटगे गट, मुश्रीफ गट आणि मुरगूडकर-पाटील गट असे राजकीय गट तयार झाले. मात्र, राजकीय सत्ता टिकविण्यात विक्रमसिंहराजे गट वगळता सर्वच गट यशस्वी झाले. गटांमध्ये फाटाफूट झाली तरी मंडलिकांची खासदारकी, मुश्रीफांची आमदारकी, संजय घाटगेंची पंचायत समितीची, तर पाटील गटाची गोकुळ, मुरगूडची सत्ता कायम राहिली होती. या पार्श्वभूमीवर सध्या राजे गटाच्या आक्रमकतेला विशेष महत्त्व आहे. त्यातूनच या गटाचे ध्रुवीकरणही झपाट्याने होत आहे.
जुन्या घाटगे गटात फूट पडण्याआधी संजय घाटगे, रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, तसेच उदयबाबा घोरपडेही होते. नगरपालिका निवडणुकीपर्यंत संस्थात्मकृदृष्ट्या किंवा आकडेवारीत राजे गटाचे स्थान चौथ्या क्रमांकाचे होते. आता मात्र, या गटाची पर्यायाने समरजितसिंह घाटगेंच्या नेतृत्त्वाची तालुकाभर चर्चा सुरू आहे. रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उदय घोरपडे, धरणग्रस्त संघटनेचे बाबूराव पाटील, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव इंगळे यांचे चिरंजीव भैया इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश झाला आहे. आता हा गट नेमक्या कितव्या स्थानावर पोहोचला आहे, हे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. तूर्ततरी पक्षप्रवेशाचे काम जोरात सुरू आहे.


बडे नेते लक्ष्य : विकासाचा लेखा-जोखा
समरजितसिंह घाटगेंनी गेल्या आठवड्यात तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करीत विकासाचा लेखा-जोखा मांडला आहे. तालुक्याच्या विकासावर भाष्य करताना आपण नवा पर्याय देऊ शकतो हे सांगत आहेत. त्यामुळे आमदार मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगेंनाही आता यावर भाष्य करावे लागणार आहे. कारण विकासाच्या उणिवा ते दाखवित आहेत


कागलमध्ये राजकीय भूकंप : घाटगे
१९७८ चा राजकीय काळ परत आणायचा आहे. यावेळी कागल तालुक्यात असणारा राजे विक्रमसिंह घाटगे गट पुनर्जीवित करायचा आहे, असे सांगत समरजितसिंह घाटगे म्हणाले, गेल्या २५ वर्षांत राजे गटाचा केवळ वापरच करून घेतला जात आहे; परंतु आता या गटातील दुरावलेला एक-एक कार्यकर्ता एकसंध होत आहे. तसेच येत्या ४८ तासांत कागलमध्ये आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राजे गटात विलीन होणारा तो नेता कोण? या चर्चेला उधाण आले असून, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत..

Web Title: Group reconstruction from Samarjit Singh Ghatgon loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.