क्षमतेचा वापर करून लौकिक वाढवा
By Admin | Published: February 4, 2015 11:43 PM2015-02-04T23:43:00+5:302015-02-04T23:58:40+5:30
कुलगुरूंचे आवाहन : खेळाडू, प्रशिक्षक, संघव्यवस्थापकांचा गौरव
कोल्हापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्याचा त्यांनी योग्य पद्धतीने वापर करावा. त्याद्वारे शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढवावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी बुधवारी केले.
शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव, आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनातील कार्यक्रमास ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. डी. आर. मोरे, डॉ. शरद हुन्सवाडकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचा अध्यक्ष पंकज मोरे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळविण्यात क्रीडा अधिविभागाचे देखील महत्त्वाचे योगदान आहे. ते लक्षात घेता या विभागाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. जास्तीत जास्त क्रीडापटूंना योग्य संधी देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील.
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते विभागीय, आंतरविभागीय स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य व सर्वाधिक गुण संपादन केल्याबदल छत्रपती शहाजी महाविद्यालयास सन २०१२-१३ मधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. शांताराम माळी, बाबासाहेब उलपे यांची भाषणे झाली.
‘सिंथेटिक ट्रॅक’ पूर्ण करणार
विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकमधील गोळाफेक, भालाफेक, आदींबाबतचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात केली जाईल. विद्यापीठातून जाण्यापूर्वी ट्रॅकचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. पवार यांनी यावेळी दिली.
क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी स्वागत केले. क्रीडा प्रशिक्षक जे. एच. इंगळे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. प्रा. दीपक डांगे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
खेळाडूंचा गौरव...
प्रेम पोटाबत्ती (सांगली), अपर्णा मगदूम, सुविचार परमाजे, अजिंक्य रेडेकर, (इचलकरंजी), प्रियांका मोरे, केतकी नावले (सातारा), सूरज खेबुडकर (वाई, सातारा), फुलचंद बांगर (कोल्हापूर), सुमित चव्हाण (वारणानगर), महमंदरूसुल अब्बास मुल्ला, ऋतुराज जाधव, अमित निंबाळकर, उत्तम मेंगाणे, विश्वजित तोरसे, (कोल्हापूर), महेश वरुटे (तिसंगी, गगनबावडा) या खेळाडूंसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खो-खो (मुले-मुली), कबड्डी, बास्केटबॉल आणि फुटबॉल (मुले) संघांचा सत्कार करण्यात आला.