शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश : चंद्रकांतदादा

By Admin | Published: January 19, 2016 12:24 AM2016-01-19T00:24:29+5:302016-01-19T00:35:49+5:30

बाजार समिती आढावा बैठक : गूळ साठवणुकीसाठी गोदामांचा वापर करा

Growers involved in Farming Taran Yojna include: Chandrakant Dada | शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश : चंद्रकांतदादा

शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश : चंद्रकांतदादा

googlenewsNext

कोल्हापूर : शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश करणार असून, त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या मालकीच्या गोदामांचा साठवणुकीसाठी वापर करावा, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे केले. येथील राजर्षी शाहू मार्केट यार्डच्या सभागृहात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाज आढावा व विभागीय पणनच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद अकरे, विभागीय निबंधक राजेंद्र दराडे, बाजार समित्यांचे समन्वय अधिकारी रमेश शिंगटे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परशुराम खाडे, उपसभापती विलास साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच वर्षांपासून गुळाचा समावेश शेतीमाल तारण योजनेत व्हावा, अशी मागणी होती. शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश लवकरच करण्यात येणार असल्याचे सहकार व पणन मंत्र पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिकाधिक सक्षम होण्यासाठी नवनवीन स्रोतांचा विचार करावा. फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये दररोज तयार होणारा कचरा आणि जनावरांच्या बाजारातील शेण यांचा वापर करून गांडूळ खत निर्मितीच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा. बाजार समितीने सक्षमीकरणासाठी व शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.
मिलिंद आकरे यांनी कोल्हापूर विभागातील एकूण शेतकरी, या ठिकाणचे एकूण भौगोलिक क्षेत्रनिहाय उत्पादन व मार्केटमध्ये न येणारा माल याबाबत अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त करून राज्य शासन व केंद्र शासन यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे प्रकाश आष्टेकर, साताऱ्याचे महेश कदम, कृषी पणन मंडळाचे उपव्यवस्थापक एस. टी. गुंजाळ, कोल्हापूर विभागाचे पणनचे उपमहाव्यवस्थापक सुभाष घुले यांच्यासह कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

कागल येथे शीतगृह होण्यासाठी प्रयत्न
स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर बाजार समितीची प्रक्रिया युनिट, शीतगृहे, गोदामे, पॅकिंग हाऊस असले पाहिजे, असे सांगून सहकारमंत्री पाटील यांनी कागल येथे शीतगृह व्हावे यासाठीही प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. पणनमधील १२ (१) च्या परवानग्या शासन स्तरावरून लवकरात लवकर देण्यात येतील, तसेच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रश्नांसाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Growers involved in Farming Taran Yojna include: Chandrakant Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.