कोतोली बाजारपेठेतील वाढती गर्दी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:36+5:302021-04-28T04:26:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेत सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांची मोठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेत सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांची मोठी गर्दी होत असल्याने परिसरात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. शासनाने पुकारलेल्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी अकरा वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी दिली असल्याने या संधीचा फायदा घेत बाजारपेठेतील इतर व्यावसायिक देखील आपली दुकाने उघडी ठेवत असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कोतोली हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट केंद्र बनले होते.
सध्या कोतोलीसह परिसरात कोरोनाचे अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ते बाजारपेठेत खुलेआमपणे फिरले गेल्याचे पुरावेदेखील समोर आहेत, तर जवळच असलेल्या तेलवे गावातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यूदेखील झाला आहे. परंतु, या बाबीचे गांभीर्य नागरिकांना व व्यापार्यांना नसल्यामुळे सकाळच्या सत्रात दररोज जणू आठवडा बाजार भरल्याची स्थिती निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मागील वर्षाप्रमाणे सक्रिय राहून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
चौकट
कोरोना समित्या सक्रिय होण्याची गरज
मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी कोतोली व परिसरातील गावांतील कोरोना समित्या सक्रिय होत्या. त्यामुळे बाहेरगावाहून येणार्या व्यक्ती व संशयितांची माहिती घेतली जात होती. प्रशासकीय अधिकारी गावाला भेट देऊन पाॅझिटिव्ह रुग्णाच्या घराशेजारचा परिसर सील करत असल्याने संसर्ग साखळी तोडण्यास मदत होत होती. मात्र, आता तसे कुठेही होताना दिसत नाही.
२७ कोतोली
फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली खरेदीसाठी नियमित मोठी गर्दी उसळत आहे.