खवय्यांच्या वाढत्या मागणीमुळे भाकरीला ‘अच्छे दिन’, महिलांना मिळाला रोजगार; यंदा 'ज्वारी-बाजरी वर्ष' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:08 PM2023-01-10T17:08:37+5:302023-01-10T17:09:08+5:30
..त्यामुळे खवय्यांचा चपातीपेक्षा भाकरीकडे ओढा वाढला
उद्धव गोडसे
कोल्हापूर : गोरगरिबांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या ज्वारीच्या भाकरीने अलीकडे हॉटेल्सच्या मेन्यू कार्डमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. चविष्ट आणि आरोग्यदायी गुणधर्मांमुळे भाकरीला मागणी वाढली आहे. परिणामी भाकरी करणाऱ्या महिलांनाहीहॉटेल्समध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. भाकरीच्या वाढत्या मागणीमुळे ज्वारीनेही गेल्या दोन वर्षांत चांगलाच भाव खाल्ला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष 'ज्वारी-बाजरी वर्ष' जाहीर केल्याने ज्वारी चर्चेत आहे.
एकेकाळी भाकरी हा गरिबाघरचा खाद्यपदार्थ समजला जायचा. सणासुदीला होणारी पुरणपोळी आणि चपातीचा अपवाद वगळता गरिबांच्या आहारात भाकरीच नित्याची होती. त्याउलट पैसेवाल्यांच्या घरात चपाती खाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण, ज्वारीच्या तुलनेत गहू पचनास जड आहे. शिवाय चपातीप्रमाणे भाकरी तेलकट नसते, त्यामुळे खवय्यांचा चपातीपेक्षा भाकरीकडे ओढा वाढला आहे. याचे प्रतिबिंब हॉटेल्सच्या मेन्यू कार्डमध्येही दिसत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार बहुतांश हॉटेल्समध्ये जेवणाच्या ताटात भाकरी दिली जाते. त्यामुळे एकेकाळी केवळ गरिबांच्या आहारात दिसणारी भाकरी आता सर्वत्र दिसत आहे.
महिलांना मिळाला रोजगार
भाकरी करणे हे कौशल्याचे काम महिलाच करतात. त्यामुळे महिलांना हॉटेल्समध्ये रोजगार निर्माण झाला आहे. हॉटेल्समध्ये भाकरी करण्याचे काम दुपारी आणि रात्री अशा दोन सत्रात चालते. प्रत्येक सत्रात महिलांना प्रत्येकी चार ते पाच हजार रुपये पगार दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३०० हॉटेल्समध्ये एक हजारहून जास्त महिला हे काम करतात.
लाखोंची उलाढाल
भाकरीला मागणी वाढताच ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या ज्वारीचे दर सध्या ४० ते ५० रुपये प्रतिकिलो आहेत. गव्हाच्या तुलनेत ज्वारीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. हॉटेल्समध्ये भाकरीचे दर २५ ते ५० रुपयांपर्यंत आहेत. यातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
कोल्हापुरात भाकरीचे अनेक पर्याय
कोल्हापुरात ज्वारी, नाचणी, बाजरी आणि मक्याच्या भाकरी केल्या जातात. यातील मक्याच्या भाकरी अलीकडे खूपच कमी ठिकाणी केल्या जातात. नाचणीच्या भाकरी करण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी सहज मिळतात.
यामुळे भाकरीला मागणी...
मोठ्या शहरांमधील अनेक महिला चपाती करतात; पण त्यांना भाकरी करता येत नाही. परिणामी इच्छा असूनही घरात भाकरी खायला मिळत नाही. यामुळे बाहेर पडल्यानंतर हॉटेल्समध्ये भाकरी खायला प्राधान्य दिले जाते. प्रवासात चपाती किंवा रोटीपेक्षा भाकरी खाणे आरोग्यदायी असते. शिवाय मांसाहारासोबत भाकरी आवडीने खाल्ली जाते, त्यामुळे सर्वच वयोगटातील खवय्यांकडून भाकरीला मागणी वाढली आहे.
पन्हाळ्याची पिठलं-भाकरी प्रसिद्ध
पन्हाळ्यावर गेल्यानंतर पर्यटकांना पिठलं-भाकरी आकर्षित करते. इचलकरंजीत अनेक वर्षांपासून भाकरी आणि मटण थाळी प्रसिद्ध आहे, तर शिरोळमध्येही साखर कारखान्यावर चविष्ट पिठलं-भाकरी मिळते.
चवदार आणि पचायला हलकी असल्यामुळे ग्राहकांकडून भाकरीला मागणी वाढली आहे. विशेषत: मांसाहाराची खासियत असलेल्या हॉटेल्समध्ये भाकरीच खाण्याला प्राधान्य दिले जाते. - उमेश भवड, मालक, हॉटेल चावडी, कळंबा