पन्हाळ्यात गावगुंडांची वाढती दहशत चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:54+5:302021-08-12T04:27:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर युवकाला अडवून दहा-बाराजणांनी अमानुषपणे मारहाण करणारा व्हिडिओ ...

The growing terror of village goons in Panhala is worrisome | पन्हाळ्यात गावगुंडांची वाढती दहशत चिंताजनक

पन्हाळ्यात गावगुंडांची वाढती दहशत चिंताजनक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर युवकाला अडवून दहा-बाराजणांनी अमानुषपणे मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तालुक्यातील गावगुंडांची दहशत नजरेसमोर आली.एकट्या-दुकट्याला गाठून मारण्याचे प्रकार तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने भाईगिरी आणि गुंडगिरीचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे. दिवसाढवळ्या वाढणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीला वेळीच पोलिसी खाक्या दाखविला नाही तर तालुक्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला असला तरी गावगुंडांनी त्याला मोगलशाही बनविली आहे. दोन- चार जणांचे टोळकं करायचे आणि एखाद्या मोडक्या कुपावर पाय देऊन हाणामारीतून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची प्रवृत्ती गावागावांत फोफावत आहे. शिक्षणाला रामराम ठोकून अर्धवट, टवाळखोर, स्वयंघोषित गावगुंड यांच्या टगेगिरीमुळे सर्वसामान्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वराती, मिरवणुका, आणि निवडणुकादरम्यान होणाऱ्या बाचाबाचीतून गावगुंडगिरीला सुरुवात होत असल्याची चर्चा आहे.

लग्नाच्या वरातीतील ढकलाढकलीच्या कारणावरून झालेल्या भांडणातील पूर्ववैमनस्याची खुन्नस म्हणून काही तरुणांंनी त्या युवकाला भररस्त्यात अडवून बेदम मारले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना गावगुंडांच्या दहशतीची माहिती मिळाली. गावागावांत तरुणाईत झालेली हमरीतुमरी गावपुढारी आपापसात मिटवत असल्यामुळे पोलिसी खाक्या मिळत नव्हता. त्यामुळे तालुक्यात गावगुंडांची दहशत बळवत आहे. कुणाची वरात आणि कुणाची भांडणे निसतरण्याची वेळ मात्र मोठ्यांवर येते. याची जरासुद्धा भनक आजच्या तरुणाईला दिसून येत नाही. या गावगुंडांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कुणालाही कधीही कुठेही कसंही मारलं आमचं काहीच बिघडत नाही, या मनोवृत्तीतून गावगुंडांची दहशत वाढत आहे. या भाईगिरीला वेळीच आवर घातला नाही तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होईल.

...........

झुंडशाहीला पोलिसी खाक्याची गरज

पन्हाळा, कोडोली, कळे या तीन ठिकाणी पोलीस चौक्या आहेत, तर कोडोली, आसुर्ले-पोर्ले, कोतोली, कळे या ठिकाणी शैक्षणिक उठाव बरोबरच गर्दीची आहे. याठिकाणी शायनिंग मारण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडतो आणि त्यातून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकट्या-दुकट्याला गाठून मारण्याचे प्रकार दोन-चार महिन्याला घडत असतात. यासाठी नेमलेली पोलिसांची भरारी पथकं काय कामाचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्टेटसवरून खुन्नस

काही तरुण नामांकित गुंडांबरोबर आपला फोटो सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करून गावात आपली दहशत माजवण्यासाठी उपयोग करत आहेत, तसेच काही टवाळखोर सशस्त्र हत्यार हातात घेऊन स्टेटसद्वारे आपल्या गुंड प्रवत्तीची झलक दाखविण्याच्या प्रकाराकडे ग्रामीण पोलिसांचा कानाडोळा असतो. त्यामुळे असे प्रकार वाढत आहेत.

Web Title: The growing terror of village goons in Panhala is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.