भेग वाढतेय; पूल कोसळल्यावरच जाग येणार काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:32 AM2017-11-20T00:32:32+5:302017-11-20T00:32:47+5:30
उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भेगेकडे रस्ते विकासच्या अधिकाºयांचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच लक्ष देणार काय? असा सवाल वाहनधारक व ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील या उड्डाणपुलावरुन कोल्हापूरहून एमआयडीसी, कागल, कर्नाटकसह पूर्व भागाला जाणारी सर्व वाहतूक होते. त्यामुळे दररोज हजारो वाहने या उड्डाणपुलावरुन ये-जा करतात. या पुलाच्या बरोबर मध्यभागी मुख्य पिलरवर उभ्या असलेल्या रस्त्याच्या जॉइंटला मोठी भेग पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रहदारीमुळे या भेगेचे अंतर वाढत चालले आहे. गत पावसाळ्यात याकडे लक्ष वेधले असता रबरबेल्टने ही भेग जोडण्याची किमया केली होती. आता रबरबेल्टही तुटून पडले असून या भेगेतील अंतरही वाढले आहे. त्यामुळे एखाद्या दुचाकी वाहनांचे चाकही या भेगेत अडकून अपघात होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष झाल्यास उड्डाणपूलही कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरुन व ुपुलाखालून जाणारे रोज जीव मुठीत धरूनच प्रवास करीत आहेत. त्यामुळे हा गंभीर प्रकार लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.