जीएसटी आणि राज्य उत्पादन शुल्कने उद्दिष्ट्य पूर्ण करावे : मंत्री शंभुराज देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 07:10 PM2021-03-15T19:10:12+5:302021-03-15T19:11:37+5:30
Shambhuraj Desai Kolhapur- वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सोमवारी केली.
कोल्हापूर : वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सोमवारी केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उप महाव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक संजय माळी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेला निधी समर्पित होणार नाही. तो खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी. विभागांना दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण होईल याबाबत नियोजन करावे. कौशल्य विकास विभागाने ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याबाबत संस्थांना सूचना द्यावी. शीतगृह उभारणी आणि तालुकास्तरावर बाजार समिती निर्माण करण्याबाबत प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पालकमंत्र्यांशी लवकरच चर्चा करू असेही ते म्हणाले.