जीएसटी, फूड सेफ्टी, बाजार समिती कराविरुद्ध लढा उभारणार : ललित गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 12:53 PM2023-10-02T12:53:59+5:302023-10-02T13:16:19+5:30
कोल्हापूर : व्यापार क्षेत्रातील नवे बदल, व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुण्यात गुरूवार, दि. ५ ऑक्टोबर ...
कोल्हापूर : व्यापार क्षेत्रातील नवे बदल, व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुण्यात गुरूवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सुमारे पाच हजारपेक्षा जास्त व्यापारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
या परिषदेला केंदीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय मंत्री भारती पवार, राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाचे अध्यक्ष सुनील सिंघी उपस्थित राहणार आहेत. अन्यायकारक कायदे रद्द करणे, पारंपरिक व्यापार टिकविणे, तो वाढविणे आणि नव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे ही राज्यस्तरीय व्यापार परिषदेच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत.
दोन सत्रांतील या परिषदेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मासिआ-मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम-मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड (कॅमिट-मुंबई), द ग्रेन, राइस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन (ग्रोमा) (मुंबई) आणि दि पूना मर्चंट्स चेंबरचे सहकार्य आहे. व्यापाऱ्यांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई)चे अध्यक्ष जितेंद्र शहा, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड (मुंबई)चे चेअरमन मोहन गुरनानी, अध्यक्ष दीपेन अग्रवाल, द ग्रेन, राइस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन (मुंबई)चे अध्यक्ष शरद मारू, दि पूना मर्चेंट्स चेंबरचे अध्यक्ष व कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी केले आहे.