बाजारात ‘जीएसटी’ची चाहूल
By Admin | Published: May 24, 2017 12:36 AM2017-05-24T00:36:03+5:302017-05-24T00:36:03+5:30
दरांबाबत व्यापारी, ग्राहकांत संभ्रम : सिमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल क्षेत्रातील खरेदी मंदावली
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) दराबाबत आवश्यक ती माहिती, स्पष्टीकरण मिळत नसल्याने कोल्हापुरातील व्यापारी-व्यावसायिक आणि ग्राहकांत अद्यापही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सध्या ‘थांबा आणि पहा’ची स्थिती दिसत आहे. सिमेंट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईलची बाजारपेठ काहीशी मंदावली आहे.
‘जीएसटी’अंतर्गत कर आकारणीचे दर जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर बाजारपेठेतील सद्य:स्थितीचा आढावा घेतला असता ही माहिती पुढे आली. कच्चा माल, वाहतूक आदींच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट उत्पादक कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका पोत्यामागे दरात ४० ते ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सिमेंट पोत्याचा दर ३४० ते ३६० रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन शुल्क आणि व्हॅट मिळून एकत्रितपणे सध्या २५ टक्के कर एका पोत्यामागे लागत आहे. आता जीएसटीद्वारे त्यात आणखीन तीन टक्क्यांची भर पडणार आहे. त्यामुळे सिमेंटची आणखी दरवाढ होणार आहे. जिल्ह्याला महिन्याला सुमारे ६५ हजार मेट्रिक टन इतके सिमेंट लागते. पूर्वीच्याच दरवाढीमुळे साधारणत: २५ टक्क्यांनी सिमेंटची मागणी कमी झाली आहे. ज्यांचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्याकडूनच सिमेंट खरेदी होत आहे. एलईडी, एलसीडी टी. व्ही., फ्रीज, वॉशिंग मशीन आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईला सध्या १३.५ टक्के इतका व्हॅट लागतो. जीएसटीमध्ये हा दर २४ ते २८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. नेमकी किती टक्क्यांनी जीएसटीमध्ये आकारणी होणार हे स्पष्ट समजत नसल्याचे व्यापारी, व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. नव्या करप्रणालीमुळे नेमके किती टक्क्यांनी दर वाढणार अथवा कमी होणार याचा अंदाज ग्राहकदेखील घेत आहेत.
सोने-चांदी दराबाबत संदिग्धता
जीएसटी करप्रणालीचा सोने-चांदी उद्योगावरील परिणामाबाबत संदिग्धता आहे. सध्या सोने चांदी खरेदी-विक्रीवर १ टक्का व्हॅट लागू आहे आणि १० कोटींच्या उलाढालीवर १ टक्का एक्साईज कर लावला जातो. त्यानुसार व्यावसायिकाला सव्वा ते दीड टक्का कर लागू होतो. मात्र, जीएसटी प्रणालीत करांची सुरुवातच पाच टक्क्यांपासून आहे. त्यामुळे सरकारने सोने-चांदी व्यवसायावरील कराची टक्केवारी निश्चित केलेली नाही. सोने-चांदी खरेदी विक्रीत जुने सोने देऊन नवीन खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यावर टॅक्स लागणार का? अलंकारांची घडणावळ, मजुरी यावरही टॅक्स लागणार का? याबाबत काहीही माहिती नाही.
‘स्टील’ची मागणी घटली
बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या स्टीलवर (सळी) आता १२.५ टक्के उत्पादन शुल्क आणि ५ टक्के व्हॅटची आकारणी होते. जीएसटीमध्ये स्टील हे १८ टक्क्यांवर राहणार की, त्यापेक्षा कमी होणार याबाबत निश्चित माहिती मिळत नाही. वाळूची दरवाढ आणि पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसल्याने अनेक प्रकल्पांचे काम थांबले आहे. त्याचा परिणाम म्हणजे स्टीलची मागणी घटली असल्याचे बांधकाम साहित्य विक्रेते धीरज पटेल यांनी सांगितले. दरम्यान, वाळूची कमतरता असल्याने स्टीलची मागणी कमी झाली आहे. जीएसटीच्या दर जाहीर होण्याचा परिणाम स्टीलच्या मागणीवर झाला नसल्याचे शिरोली येथील विक्रेते हसमुख पटेल यांनी सांगितले.
४केंद्राच्यावतीने या उद्योगावरील कराची टक्केवारी ३ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या करापेक्षा जीएसटीच्या कराची टक्केवारी जास्त असली तर सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली.
जीएसटीच्या दर घोषणेनंतर टी.व्ही., फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीबाबत ग्राहक हे ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूच्या मार्केटची स्थिती मध्यम आहे. कराचा दर नेमका किती असणार याबाबत व्यापारी, ग्राहकांत संभ्रमावस्था आहे.
- सचिन मांगले
प्रोप्रायटर, श्री सिद्धी होम अॅप्लायन्सेस
जीएसटीच्या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या बाजारपेठेतील उलाढाल गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ४० टक्क्यांनी मंदावली आहे. अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबाबत अशीच स्थिती आहे. सध्याचा १३.५ टक्के इतका कर हा जीएसटीमुळे २८ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. किती टक्क्यांनी कर वाढणार हे स्पष्ट होत असल्याने या बाजारपेठेतील वितरक, विक्रेत्यांनी नवी खरेदी थोडी कमी केली आहे. जीएसटीच्या दरांबाबत व्यापारी-व्यावसायिकांना अचूक, लवकर माहिती मिळणे आवश्यक आहे.
- गिरीष शहा, प्रोप्रायटर,
सॅमसंग प्लाझा