कोल्हापुरात जीएसटी अधिकारी लाच घेताना जाळ्यात, कार्यालयातच घेतले २५ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:05 PM2024-10-22T17:05:10+5:302024-10-22T17:06:39+5:30

जीएसटी विभागात खळबळ

GST officers were caught taking bribes and took Rs. 25,000 from the office itself In Kolhapur | कोल्हापुरात जीएसटी अधिकारी लाच घेताना जाळ्यात, कार्यालयातच घेतले २५ हजार रुपये

कोल्हापुरात जीएसटी अधिकारी लाच घेताना जाळ्यात, कार्यालयातच घेतले २५ हजार रुपये

कोल्हापूर : ऑइल आणि ग्रीस विक्री करणाऱ्या कंपनीच्या कागदपत्रांत त्रुटी असल्याचे सांगून दोन लाखांचा दंड माफ करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या वर्ग २च्या राज्य कर अधिकाऱ्यास (स्टेट जीएसटी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. निवास श्रीपती पाटील (वय ४५, सध्या रा. नागाळा पार्क, कोल्हापूर, मूळ रा. कोलोली, ता. पन्हाळा) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २१) दुपारी जीएसटी कार्यालयात झाली.

एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची ऑइल आणि ग्रीस विक्रीची कंपनी आहे. जीएसटी विभागाने २०२०-२१ मध्ये कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानंतर जीएसटी अधिकाऱ्याने कंपनीची पाहणी केली. कंपनीचा बँक खाते नंबर जीएसटी विभागाच्या पोर्टलमध्ये नोंदवला नाही. तसेच जमा-खर्चाचा तपशील योग्य पद्धतीने अपलोड केला नाही. याबद्दल दोन ते अडीच लाखांचा दंड होऊ शकतो, अशी भीती कर अधिकारी निवास पाटील याने घातली. दंडातून माफी पाहिजे असल्यास २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. याबाबत तक्रारदाराने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

पडताळणी झाल्यानंतर सोमवारी दुपारी सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी २५ हजारांची लाच घेताना निवास पाटील रंगेहाथ सापडला. त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याच्या घराची झडती सुरू असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. निरीक्षक आसमा मुल्ला, अंमलदार अजय चव्हाण, विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

जीएसटी विभागात खळबळ

आठ महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईत जीएसटी विभागातील एक अधिकारी लाच घेताना सापडला होता. सोमवारी झालेल्या कारवाईनंतर या विभागात खळबळ उडाली. कारवाईची भीती घालून अधिकारी हजारो रुपये उकळत असल्याची चर्चा व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.

Web Title: GST officers were caught taking bribes and took Rs. 25,000 from the office itself In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.