कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

By संदीप आडनाईक | Published: July 29, 2023 12:01 PM2023-07-29T12:01:17+5:302023-07-29T12:02:27+5:30

कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशय

GST raids on two companies in Kagal MIDC Kolhapur | कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

googlenewsNext

कोल्हापूर : माल एकाचा आणि बिल एकाचे अशी बोगस बिले सादर केल्याच्या संशयावरून बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोन प्रतिष्ठित उद्योगांवर कोल्हापूर येथील जीएसटीच्या पथकाकडून छापे टाकले. या मोठ्या कंपन्यांची चौकशी अद्याप सुरू आहे.

बनावट व्यापाऱ्यांकडून बनावट बिले सादर करून काही व्यवहार झाले आहेत का या दोन मुद्यांवर कोल्हापूर येथील जीएसटी पथकाकडून स्थानिक पातळीवरील या कंपन्यांची दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात येत आहेत. याद्वारे काही निर्यातदारांनी रोख रकमेद्वारे करांचे कोणतेही पैसे भरले नसल्याचेही स्पष्ट होण्याचीही शक्यता आहे. मात्र याची पडताळणी अद्याप सुरू असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.

बनावट व्यापारी बनून बनावट खरेदी झाल्याच्या संशयावरून कोल्हापूरच्या जीएसटी विभागाने गेल्या दोन दिवसांपासून या कंपन्यांवर हे छापे टाकले. त्यांच्याकडील कागदपत्रांची अद्याप तपासणी सुरू आहे. या दोन्ही कंपन्या बोगस नसल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांच्यासंदर्भातील कांही व्यवहार बोगस असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे, त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. या दोन कंपन्या मोठ्या असल्यामुळे जीएसटी विभागाकडून दहा ते बारा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केलेले आहे, अशी माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली. या छाप्यामुळे औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली.

स्टील आणि स्क्रॅप या दोन व्यवसायांमध्ये बनावट व्यापाऱ्यांकडून व्यवहार होत असतात. कागलच्या दोन्ही कंपन्यांबाबतीतही हाच प्रकार झाल्याचा संशय आहे. स्थानिक जीएसटी विभागाने औद्योगिक वसाहतीला प्रत्यक्ष जागेवर अचानक भेट देउन कागदपत्रे ताब्यात घेतली. कंपन्या मोठ्या असल्याने दहा ते १२ जणांचे पथक काम करत आहे. जीएसटी भवनात ही कागदपत्रे आणून त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: GST raids on two companies in Kagal MIDC Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.