जीएसटी करप्रणाली पारदर्शक
By admin | Published: June 17, 2017 12:25 AM2017-06-17T00:25:36+5:302017-06-17T00:25:53+5:30
सचिन जोशी : जवाहर साखर कारखाना येथे जीएसटीविषयक कार्यशाळेत केले मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
हुपरी : जागतिक पातळीवर सध्या १५0 देशांमध्ये जीएसटी करप्रणाली अंमलात आहे. भारतामध्ये ही करप्रणाली १0 वर्षांच्या प्रवासानंतर आता १ जुलैपासून लागू करण्यात येत असून, ही करप्रणाली अत्यंत पारदर्शक, सोपी व सर्वच घटकांना सोयीस्कर अशी आहे. विविध वस्तूंवर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटीची आकारणी होणार असून, साखरेवरती ती ५ टक्के आकारण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे विक्रीकर सहायक आयुक्त सचिन जोशी यांनी दिली.
केंद्र शासनाने देशभर येत्या १ जुलैपासून जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या करप्रणालीची माहिती सर्वांना होण्याकरिता हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखाना येथे शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी
त्यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी स्वागत
केले.
यावेळी संतोष साळोखे व अमित हसबनीस यांनी स्लाईड शोद्वारे जीएसटीची नोंदणी, आॅनलाईन रिटर्न व भरणा कसा करावयाचा याबाबतची सविस्तर माहिती दिली.
कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, सध्याच्या
क्लिष्ट करप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करून सर्वांना सोईस्कर
होईल, अशी जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्याचा स्तुत्य निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला
आहे.
यावेळी विक्रीकर सल्लागार शरद देशपांडे, चेतन देशपांडे, जे.
जे. पाटील, संचालक बाबासाहेब नोरजे, पुंडलिक वार्इंगडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, आदी उपस्थित होते.
करामध्ये नियमितता येणार
जोशी म्हणाले, देशात सध्या अस्तित्वात असणारे उत्पादन कर, खरेदीकर, विक्रीकर, करमणूककर, सेवाकर, आदी विविध प्रकारची करप्रणाली ही अत्यंत गुंतागुंतीची व किचकट स्वरूपाची आहे. या करप्रणालीमध्ये पूर्णत: बदल करून वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) कायदा मंजूर केला आहे. यामुळे देशातील विविध राज्यांत एकाच प्रकारच्या वस्तूंच्या किमतीवरील करामध्ये नियमितता येणार आहे.