पर्यावरण संवर्धनात मानवी अस्तित्वाची हमी
By admin | Published: June 6, 2015 12:33 AM2015-06-06T00:33:22+5:302015-06-06T00:54:20+5:30
अशोक भोईटे : शिवाजी विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
कोल्हापर र : पर्यावरणाच्या संवर्धनातच मानवी तसेच अन्य प्राणिमात्रांच्या अस्तित्वाची हमी आहे, याचे भान आपण बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी शुक्रवारी येथे केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी वनस्पतीशास्त्र अधिविभागातील लीड बॉटनिकल गार्डनला भेट देऊन वृक्षारोपण केले. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात अधिविभाग प्रमुख प्रा. एस. आर. यादव यांनी विशेष सादरीकरण केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. भोईटे बोलत होते. डॉ. भोईटे म्हणाले, भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वनस्पतींची लागवड, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे अनिवार्य आहे. या पिढ्यांना काही सकारात्मक द्यावयाचे असेल तर ते समृद्ध व संपन्न पर्यावरणच द्यावे लागेल. कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या आवारात डॉ. भोईटे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक प्रा. आर. बी. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, पर्यावरण अधिविभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये पाम रोपांच्या विविध प्रजातींचा समावेश होता. प्रा. यादव यांनी विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांना लीड बॉटनिकल गार्डनची माहिती दिली. या गार्डनमध्ये अनेक दुर्मीळ रोपांची लागवड, जोपासना व संवर्धन करण्यात येत असून, पामच्या सुमारे वीस प्रजाती येथे उपलब्ध असल्याचे प्रा. यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)