शेतकऱ्यांनी सातबारावर भात पीकपाणी नोंद केल्यास हमीभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:42+5:302021-07-15T04:17:42+5:30
भात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांशी शेतकरी इतर पिकाकडे वळला होता.भात पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषिखात्यामार्फत सन २०२० ...
भात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांशी शेतकरी इतर पिकाकडे वळला होता.भात पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषिखात्यामार्फत सन २०२० या खरीप हंगामात पिकविलेल्या भाताला प्रतिक्विंटल १८६८ रुपये हमीभाव व राज्य शासनाने प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. असे एकूण २५६८ रुपये प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे; मात्र ज्या शेतात या भाताचे पीक शेतकरी घेणार आहे. त्या गटाच्या सातबारा उताऱ्यावर दरवर्षी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पीकपाणी कार्यक्रमात भातपीक अशी नोंद असणे गरजेचे आहे.
यावर्षी ही योजना कार्यान्वित झाल्यास अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार असे चित्र दिसते.
जिल्ह्यात भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते; मात्र या भात उत्पादित पिकाला योग्य भाव देणारी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच प्रसंगी उत्पादित खर्च व त्याला मिळणारा भाव याच्यामध्ये मोठी तफावत याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध असताना ही योजना अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने या लाभापासून वंचित राहिले आहेत.
खासगी व्यापारी या भाताची खरेदी कमी दराने करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात.योग्य भाव न मिळाल्याने प्रसंगी शेतकरी कर्जबाजारीच राहतो.यासाठी शासकीय केंद्रावर भात विक्रीसाठी पीकपाणी नोंद सातबारावर आवश्यक आहे.
गत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी,आजरा, तुर्केवाडी व अडकूर या चार शासकीय भात खरेदी केंद्रावर उत्पादित दोन लाख एक्याऐंशी हजार क्विंटल भातापैकी फक्त सात हजार क्विंटल भात खरेदी केले होते. हे प्रमाण उत्पादित भाताच्या फक्त अडीच टक्के आहे.इतर भाताची खरेदी ही कमी दराने केली असावी अशी दिसते. भाताला जास्त दर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर नोंदणी करावी.