'गनिमी काव्याने घेतला मराठा आरक्षणाचा निर्णय'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:11 AM2018-12-04T05:11:32+5:302018-12-04T05:11:38+5:30
मराठा आरक्षण निर्णय होण्याआधीच तो हाणून पाडण्यासाठी काही जण काळे कोट घालून सज्ज होते;
कोल्हापूर : मराठा आरक्षण निर्णय होण्याआधीच तो हाणून पाडण्यासाठी काही जण काळे कोट घालून सज्ज होते; त्यामुळे ‘गनिमी काव्या’नेच आरक्षणाचा निर्णय घेतला. तसेच या आरक्षणाविरोधात कोणी न्यायालयात गेले तरी ते टिकण्यासाठी सरकारच्या वतीने भक्कमपणे बाजू मांडली जाईल, अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
मराठा आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी ‘गनिमी कावा’ करणे गरजेचे होते. आपण व मुख्यमंत्री यांनी रात्रंदिवस या विषयावर काम करून हा निर्णय घेतला. मागासवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर मांडण्यासाठी आग्रह होत होता; परंतु तो मांडणे अडचणीचे होते. हे आता लोकांच्या लक्षात येईल. हे आरक्षण टिकण्यासाठी न्यायालयात सरकार भक्कमपणे बाजू मांडेल.
>नियुक्तीचा मार्ग मोकळा
गेल्या आरक्षणाच्या कायद्यात स्थगिती मिळण्यास सहा महिने लागले. तोपर्यंत या कायद्याची पुढे अंमलबजावणी करत असताना ४०० जणांना नियुक्ती पत्रे मिळाली, ते आता नोकरी करत आहेत.
परंतु त्यांना दर ११ महिन्यांनी न्यायालयात जाऊन म्हणणे सादर करावे लागत होते. ते आता या नवीन कायद्यामुळे करावे लागणार नाही.
तसेच ६००० जणांना नियुक्ती पत्रे हातात मिळणे बाकी होते. त्यांनाही ती आता मिळणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.