बारामतीच्या लाडूंनी पालकमंत्र्यांचे तोंड गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:11 PM2019-05-25T18:11:49+5:302019-05-25T18:13:06+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना बारा किलो लाडू देत त्यांचे तोंड गोड केले. पाटील यांनीही दिलखुलासपणे हे लाडू स्वीकारत भाजपच्या विजयाचे पेढे या
कोल्हापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना बारा किलो लाडू देत त्यांचे तोंड गोड केले. पाटील यांनीही दिलखुलासपणे हे लाडू स्वीकारत भाजपच्या विजयाचे पेढे या कार्यकर्त्यांना दिले.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील दहा जागांची जबाबदारी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी लोकसभेच्या प्रचारावेळी बारामतीमध्ये घर भाड्याने घेऊन तेथेच मुक्काम ठोकला होता. पुण्यापासून माढ्यापर्यंत जोडण्या लावत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाम फोडला होता. एवढेच नव्हे तर निकालाच्या आदल्या दिवशी ‘पवारांच्या घरातील कुणीही यंदा संसदेत नसेल’ असे भाकीत केले होते.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा जंगी विजय झाल्याने बारामतीचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रवीण शिंदे, पुणे शहर चिटणीस यशवंत ठोकळ, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विशाल जाधव यांनी शुक्रवारी दुपारी थेट पालकमंत्री पाटील यांचे घर गाठले. बारामतीहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याचा निरोप पाटील यांना दिला गेला.
यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी आल्याचे कारण सांगत पाटील यांना सुळे यांच्या विजयाचे लाडू दिले. पाटील यांनीही लाडू स्वीकारत आपली भूमिका मांडली. मी नेहमीच राजकारण डोक्यात ठेवत नाही. जेव्हा बारामतीला येईन, तेव्हा आवर्जून सुप्रियातार्इंच्या घरी चहासाठी येणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. एवढेच नव्हे तर आमची केंद्रात सत्ता आली आहे, तेव्हा आमचेही पेढे घ्या, असे सांगून पाटील यांनी कार्यकर्त्यांना पेढे दिले.