शेतमजुरांचा पालकमंत्र्यांच्या नावाने शंखध्वनी, कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:51 AM2019-01-31T10:51:03+5:302019-01-31T10:57:36+5:30

कल्याणकारी मंडळ स्थापनेसह अन्नसुरक्षेतून रेशन, तीन हजारांच्या पेन्शनच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतमजुरांनी शंखध्वनी करून निषेध केला. निवेदन घ्यायला वेळ नाही म्हणणारे पालकमंत्री महिनाभरात मते मागण्यासाठी कसे दारात येतात ते पाहतोच, असा गर्भित इशाराही दिला गेला. येत्या १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान या प्रश्नावर बैठक घेतो, असे पालकमंत्र्यांच्या वतीने स्वीय सहायकांनी लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन संपविण्यात आले.

The Guardian of the Farmers | शेतमजुरांचा पालकमंत्र्यांच्या नावाने शंखध्वनी, कार्यालयासमोर ठिय्या

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या नेतृत्वाखाली शेतमजुरांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कावळा नाका येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर महिलांनी तेथेच शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. /फोटो नसीर अत्तार

Next
ठळक मुद्देशेतमजुरांचा पालकमंत्र्यांच्या नावाने शंखध्वनी,कार्यालयासमोर ठिय्या कावळा नाका येथे महाराष्ट्र शेतमजूर युनियनचे आंदोलन

कोल्हापूर : कल्याणकारी मंडळ स्थापनेसह अन्नसुरक्षेतून रेशन, तीन हजारांच्या पेन्शनच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतमजुरांनी शंखध्वनी करून निषेध केला. निवेदन घ्यायला वेळ नाही म्हणणारे पालकमंत्री महिनाभरात मते मागण्यासाठी कसे दारात येतात ते पाहतोच, असा गर्भित इशाराही दिला गेला. येत्या १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान या प्रश्नावर बैठक घेतो, असे पालकमंत्र्यांच्या वतीने स्वीय सहायकांनी लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन संपविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने दुपारी मोर्चा काढून पालकमंत्र्यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सासने मैदानावरून दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सासने मैदान, मध्यवर्ती बसस्थानक, राजीव गांधी पुतळामार्गे हा मोर्चा कावळा नाक्याकडे मार्गस्थ झाला. अडीच वाजता कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना कार्यालयात घुसण्यापासून रोखले. त्यानंतर सर्व मोर्चेकरी रस्त्यावरच ठिय्या मारून बसले.

हातात लाल झेंडे घेऊन महिला शेतमजूर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोर्चेकरी महिलांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत बैठकीची तारीख ठरत नाही तोवर ठिय्या उठणार नसल्याचा निर्धार करीत त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. यावेळी नेत्यांनी भाषणातून सरकारच्या मजुरांविरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेत दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हिसका दाखविण्याचा इशारा दिला.

दरम्यान, मोर्चेकऱ्यांच्या वतीने शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कसबे, चंद्रकांत यादव, सुरेश सासने यांनी पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक बी. बी. यादव यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. लेखी पत्र घेतल्याशिवाय उठणार नसल्याच्या मुद्द्यावर ठाम राहत युनियनने यादव यांना तासभर हलूच दिले नाही.

अखेर यादव यांनी कृषी तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधून ‘येत्या १५ ते २० तारखेपर्यंत मंत्रालयात बैठक घेऊ,’ असे लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे युनियनने जाहीर केले. आंदोलनात अण्णासो रड्डे, वत्सला भोसले, संजय टेके, अरुण मांजरे, आक्काताई मोहिते, विमल कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

अडीच तास रस्त्यावरच

पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. भर दुपारच्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर अडीच तासांहून अधिक काळ महिला बसून होत्या. शिरोळ, हातकणंगलेतून आलेल्या या महिलांनी घरातून येतानाच आपल्यासोबत न्याहरी बांधून आणली होती.

शिरोळच्या तहसीलदारांना तुरुंगात डांबा

शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव हे मनमानी कारभार करीत असून, त्यांनी जाणीवपूर्वक गोरगरीब वृद्धांची पेन्शन बंद केली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तुरुंगात डांबा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

शेतमजुरांच्या मागण्या

  1. स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
  2. घरबांधणीसाठी तीन लाखांचे अनुदान द्या.
  3. ६0 वर्षांवरील मजुरांना दरमहा ३००० पेन्शन द्या.
  4. किमान वेतन कायद्याची पुनर्रचना करा.
  5. कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करा.
  6. रोख नको, रेशनवर धान्यच मिळावे.
  7. मजुरांची नोंदणी गावचावडी, ग्रामपंचायतीत व्हावी.
  8. निराधार योजनासाठी उत्पन्न मर्यादा ६० हजार करावी.

 



 

 

Web Title: The Guardian of the Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.