पालकमंत्री प्रचारासाठी आजपासून मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:31 AM2019-03-04T00:31:07+5:302019-03-04T00:31:13+5:30
कोल्हापूर : चंद्रकांत पाटील कोणाचा प्रचार करणार अशा बातम्या वृत्तपत्रांतून येत आहेत; त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु ...
कोल्हापूर : चंद्रकांत पाटील कोणाचा प्रचार करणार अशा बातम्या वृत्तपत्रांतून येत आहेत; त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु आता युती झाल्याने कोणीही शंका बाळगायची गरज नाही. आज, सोमवारी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्या मुरगूड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मैदानात उतरून प्रचाराला सुरुवात करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले.
शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापौर सरिता मोरे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, नगरसेवक अजित ठाणेकर, माजी नगरसेवक अजित राऊत, सुनील मोदी, माजी महापौर बाजीराव चव्हाण आदींची होती. पालकमंत्र्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.
मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरसह हातकणंगले, सातारा, सांगली, माढा, सोलापूर अशा एकापाठोपाठ युतीच्या जागा जिंकूनच दाखवू. मी मैदानात उतरल्यावर काय होते हे विरोधकांना माहीत आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये मध्यंतरीच्या काळात झालेल्या घडामोडींवरून विरोधकांना आम्ही एकत्र येणार नाही असे वाटत होते. ते त्यांच्या आघाडीच्या बैठका जाहीरपणे घेत होते; परंतु आमच्या बैठका कुठे सुरू होत्या याची त्यांना कल्पना नव्हती. आता युती झाल्याने आम्ही एकत्रच राहणार असून, कोणीही शंका बाळगू नये.
अरुण दुधवडकर म्हणाले, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही जागांसह राज्यातील सर्व जागा जिंकण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडू.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शहरातील पुतळ्यांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले असून, ते लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महापौर सरिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. रविकिरण इंगवले यांनी प्रास्ताविक केले. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.
गांधी मैदानासाठी ९० लाखांचा निधी मंजूर
गांधी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची मागणी रविकिरण इंगवले यांनी केली होती. त्यानुसार ९० लाखांचा निधी यासाठी मंजूर केला असून, हा एक टप्पा आहे.
हा निधी पुरेसा नसून या कामासाठी दोन ते अडीच कोटी खर्च येणार असून उर्वरित निधी पुढील टप्प्यात देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.
...तर शिवसेना-भाजपचा महापौर होईल
युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येण्याचा योग आला आहे. राज्यात युती झाली आहे; त्यामुळे आता महापालिकेतही युती होणे गरजेचे आहे.
दोघांनी एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढविल्यास शिवसेना-भाजपचाच महापौर होईल व विविध प्रकल्प राबविता येतील, असा विश्वास रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केला.