Kolhapur: स्थलांतर, शाळेबाबत पालकमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्णय, पुरस्थितीचा घेतला आढावा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 27, 2023 05:29 PM2023-07-27T17:29:19+5:302023-07-27T17:30:46+5:30
जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली.
कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडूनही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे, एक दरवाजा बंद झाला आहे त्यामुळे पुराच्या भीतीने स्थलांतरित केलेल्या नागरिकांना उद्या, शुक्रवारपासून आपआपल्या घरी परत पाठवून द्या अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. पुराच्या भीतीने गेले दोन दिवस बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा देखील उद्यापासून वाजणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी हॉलमध्ये पुरस्थितीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर तसेच कुंभी, कासारी, व तुळशी धरण भरले असते तर पंचगंगेची पाणी पातळी ५ ते ७ फुटांनी वाढले असते. पण कुंभी, कासारी व तुळशी धरण अजून भरलेले नाही तसेच राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊसही कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरवाजे उघडल्यावरही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. गुरुवारी ऑरेज अलर्ट आहे त्यामुळे एक दिवस थांबा, पाणी पातळी किती वाढते, कमी होते, परिस्थिती बघून शुक्रवारी सकाळी स्थलांतरित झालेल्या नागरिकांना घरी पाठवा. अनेक दिवस त्यांना घराबाहेर ठेवणे योग्य नाही.
परीक्षांसाठी वेळ..
पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र या दोन दिवसांमध्ये अनेक शाळांमध्ये पेपर सुरु होते ते रद्द करावे लागले. पण त्याचा मुलांच्या अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होऊ देणार नाही. परीक्षा घेण्यासाठी वेगळी तारीख दिली जाईल असेही पालकमंत्री केसरकर म्हणाले.