Kolhapur: वाहनांच्या ताफ्याशिवाय पालकमंत्री हसन मुश्रीफ आले, पहारेकऱ्याने गेटवरच रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:53 PM2024-10-15T13:53:37+5:302024-10-15T13:53:59+5:30
नाट्यगृहाच्या परिसरात चर्चा रंगली
कोल्हापूर : सोमवारी सकाळी ७ वाजताची वेळ. लाल रंगाची एक कार केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारात शिरत असताना महापालिकेच्या पहारेकऱ्याने ती गेटवरच रोखली. कार चालकाने गेट उघड, असे सांगूनही पहारेकऱ्याने ऐकले नाही. उलट पहारेकऱ्यानेच त्यांना पलीकडील गेटने आत जा, असे सांगितले. तेव्हा कार चालकाने.. अरे गाडीत कोण आहे ते तर बघ, अशी सूचना करताच त्याने पुढे येऊन पाहिले तर कारमध्ये चक्क पालकमंत्री हसन मुश्रीफ! पहारेकऱ्याच्या लक्षात येताच त्याने गेट उघडले आणि त्यांची गाडी आत सोडली. पालकमंत्र्यांची कार रोखल्याच्या प्रकाराची चर्चा मात्र नाट्यगृहाच्या परिसरात चांगलीच रंगली.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्रबांधणीच्या कामाचा प्रारंभ सोमवारी सकाळी ७ वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता. खासदार शाहू छत्रपती यांच्या सूचनेनुसार ही वेळ ठरविण्यात आली. मुश्रीफ यांचा स्वत:चा चालक वेळेत न आल्याने ते सरकारी कार, पोलिस पायलट व एस्कॉर्ट कारची वाट न पाहता स्वीय सहायक शिवाजी पाटील यांच्या लाल रंगाच्या कारमधून कोल्हापूरला यायला निघाले.
मुश्रीफ यांनी ७ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. त्यावेळी नाट्यगृहाचे मुख्य गेट बंद होते. कारमध्ये कोण आहे, हे पहारेकऱ्याने पाहिलेच नव्हते. त्यामुळे चक्क पालकमंत्री बसलेली कार त्याने आत सोडली नाही. नंतर चूक लक्षात येताच त्याने तत्काळ गेट उघडले. मुश्रीफ यांनी मात्र त्या पहारेकऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.