मंत्र्यांसमोर नुसता दिखावा, फाईल जातात पुन्हा थप्पीला; कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातील वास्तव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:22 PM2023-12-05T12:22:14+5:302023-12-05T12:22:36+5:30

हा उपक्रम म्हणजे इव्हेंटच होत असल्याचे चित्र

Guardian Minister Hasan Mushrif Janata Darbar is just a show | मंत्र्यांसमोर नुसता दिखावा, फाईल जातात पुन्हा थप्पीला; कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातील वास्तव 

मंत्र्यांसमोर नुसता दिखावा, फाईल जातात पुन्हा थप्पीला; कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातील वास्तव 

कोल्हापूर : जनता दरबार सुरू झाल्यापासून दर महिन्याला न चुकता तक्रार अर्ज घेऊन येतो, पुढच्या महिन्याचा जनता दरबारला दाेन दिवस राहिले की विभागाकडून पत्र येते तुमच्या विषयावर कार्यवाही सुरू आहे, पाठपुरावा सुरू आहे, वस्तुस्थिती पडताळणी सुरू आहे, संबंधित विभागाला कळवले आहे, त्यापुढे काही गाडी सरकलेली नाही. वर्षानुवर्षे अधिकारी दाद घेत नाहीत म्हणून आम्ही इथे येतो, इथे मंत्र्यांसमोर अधिकारी होय होय म्हणतात फाइल काही पुढे सरकत नाही..असे अनुभव जनता दरबारसाठी उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी सोमवारी लोकमतला सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात दरबार भरवला जातो. सोमवारीही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सातशेच्यावर नागरिक आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने आले होते. यातील पाच-सहा लोकांची लोकमतने भेट घेतली व त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्या सर्वांचेच नुसतेच हेलपाटे झाले आहेत, एकाचेही काम झाले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यातील काहींनी भीतीपोटी नावे सांगितली नाहीत.

माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांचे केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या पेन्शनमधील फरकाची जवळ १३-१४ लाख रुपये अडकले आहेत. कर्मचारी दरवेळी नवे कारण सांगतात. वैतागून बोललो की, फाइलमध्ये क्युरी काढेन अशी धमकीच देतात. मंत्र्यांकडून अर्ज परत तिथेच जातो आमचे प्रश्न कसे सुटणार..? - एक तक्रारदार, कागल
 

शाहुपूरी हा रहिवास भाग असताना तिथे ऑइल मिल बेकायदेशीररीत्या सुरू आहे. प्रचंड प्रदूषण होते, अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याविरोधात २०१२ पासून पाठपुरावा करत आहे. महापालिका व पर्यावरणवाले एकमेकांवर ढकलतात. तीनही जनता दरबारमध्ये मी हा विषय मांडला आहे. मंत्र्यांसमोर सगळे अधिकारी होय होय म्हणत मान हलवतात, आम्हाला पत्र पाठवतात पण पुढे कार्यवाही करत नाहीत. - रहिवासी, कोल्हापूर.

जमिनीच्या फेरफारीत चुकीची नोंद झाली आहे. माझ्या हक्काची जमीन, विहीर या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याला देऊन टाकली. आता चुकीचं आहे तेच बरोबर म्हणून सांगतात, शासनाने न्याय दिला नाही तर आमच्यासारख्यांनी जायचं कुठे..? - सीताराम पाटील, कपिलेश्वर, ता. राधानगरी


कोल्हापूर महापालिकेअंतर्गत मी २००८ ते २०१३ पर्यंत रस्त्यांचे काम करून दिले. त्यावेळी भरलेले डिपॉझीट १० वर्षे झाले तरी मिळालेले नाही. पाठपुरावा करून दमलो म्हणून मागच्या जनता दरबारला आलो, दोन दिवसांपूर्वी उत्तर मिळाले तुमच्या अर्जावर कार्यवाही सुरू आहे. महिन्याभरात काही झाले नाही. महापालिकेचा भोंगळ कारभार आहे. - रविराज मोहिते. कॉन्ट्रॅक्टर

यावर उपाय काय..?

सध्याच्या लोकशाही दिनाचा फक्त अर्ज स्वीकारले यापेक्षा जास्त काही उपयोग होत नाही. पालकमंत्र्यांनी लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले एवढेच काय ते समाधान. त्याउपर हा उपक्रम म्हणजे इव्हेंटच होत असल्याचे चित्र दिसते. ते तसे व्हायचे नसेल तर गेल्या लोकशाही दिनामध्ये आलेल्या लोकांच्या तक्रारींचे काय झाले यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी भर दिला पाहिजे. किती अर्ज आले व त्यातील किती लोकांचे प्रश्न सोडवले याचा लेखाजोखा मंत्र्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची गरज आहे. तरच यंत्रणेवर त्याचा जरब बसू शकेल.

मेंढपाळाला मदत

मागील आठवड्यात कागल येथील खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरसच्या हल्ल्यात मयत झाली. त्यांना हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजारांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी मेंढपाळाला शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत देण्याची सूचना केली.

Web Title: Guardian Minister Hasan Mushrif Janata Darbar is just a show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.