पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इचलकरंजी दौरा रद्द, सुळकूड पाणी योजना कृती समितीने विरोध केल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:13 PM2023-11-27T15:13:42+5:302023-11-27T15:13:57+5:30
सुळकूड पाणी योजनेसंदर्भात मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील नागरिकांच्या तीव्र भावना
इचलकरंजी : इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. सुळकूड पाणी प्रश्नावर नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने आज, सोमवारी होणारा हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.
आयजीएम रुग्णालयात सिटी स्कॅन व अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहेत. तसेच नवीन मशीनरी आणण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २५) होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले होते. मात्र, तो दिवस रद्द करून पुन्हा सोमवारी ठेवण्यात आला होता. परंतु आता सोमवारीही हा कार्यक्रम होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुश्रीफ यांचा इचलकरंजी दौरा रद्द झाला.
सुळकूड पाणी योजनेसंदर्भात मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील नागरिकांच्या तीव्र भावना होत्या. त्यानंतर आजअखेर मुश्रीफ यांनी इचलकरंजीत प्रवेश केला नाही. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने अण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटजवळ एकत्र येत मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू आहे.