स्वार्थापोटीच पालकमंत्र्यांनी 'गोकुळ'ची निवडणूक लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:31+5:302021-04-24T04:25:31+5:30
नेसरी : कोरोनामुळे राज्यातील ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने पुढे ढकलल्या; परंतु केवळ वैयक्तिक स्वार्थापोटीच ‘गोकुळ’ची निवडणूक लावून ...
नेसरी : कोरोनामुळे राज्यातील ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने पुढे ढकलल्या; परंतु केवळ वैयक्तिक स्वार्थापोटीच ‘गोकुळ’ची निवडणूक लावून पालकमंत्र्यांनी ठरावधारकांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज (शुक्रवारी) केला. कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भैया कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी कोषाध्यक्ष बाळ कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेचे जिल्हा संघटक संग्राम कुपेकर यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
महाडिक म्हणाले, गोकुळ दूध संघ हा उत्पादकांना ८२ टक्के परतावा देणारा आशिया खंडातील एकमेव संघ असून, साडेपाच लाख दूध उत्पादकांना ‘गोकुळ’चा आधार आहे.
भरमू पाटील म्हणाले, गोकुळची धुरा महाडिक व पी.एन. पाटील यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
बाळ कुपेकर म्हणाले, अखेरपर्यंत आपल्याला झुलवत ठेवून विरोधी आघाडीने आपल्यावर अन्याय केला. म्हणूनच सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, बी.एम. पाटील-वाघराळीकर, कृष्णराव वाईगडे, तानाजी पाटील, भरमाण्णा गावडा यांचीही भाषणे झाली.
मेळाव्यास उमेदवार सदानंद हत्तरकी, सम्राट महाडिक, रणजितसिंह पाटील-मुरगूडकर, वसंत नंदनवाडे आदींची उपस्थिती होती.