केवळ ‘गोकुळ’ विरोधासाठी पालकमंत्र्यांनी निवडणूक लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:44+5:302021-04-24T04:25:44+5:30
# सत्ताधारी पॅनलला कुपेकर गटाचा पाठिंबा नेसरी : देशात आणि राज्यात उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील ४५,००० सहकारी संस्थांच्या निवडणुका ...
# सत्ताधारी पॅनलला कुपेकर गटाचा पाठिंबा
नेसरी : देशात आणि राज्यात उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील ४५,००० सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या केवळ आणि केवळ गोकुळ विरोधामुळे म्हणून निवडणूक लावली गेली, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील कुपेकर गटाचा राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित संग्रामसिंह कुपेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे व के. डी. सी. सी. बँकेचे माजी संचालक भैयासाहेब कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाडिक म्हणाले, सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला कुपेकर गटाने पाठिंबा दिल्याने आमचे बळ वाढले आहे. त्यांना उमेदवारी देणे शक्य झाले नाही, तरीही त्यांनी पाठिंबा दिला, त्यासाठी आभार. गोकुळ दूध संघ हा उत्पादकांना ८२ टक्के परतावा देणारा आशिया खंडातील एकमेव संघ असल्याचा दावा महाडिक करत साडेपाच लाख दूध उत्पादकांना आधार मिळत असल्यानेच लोक या निवडणुकीसाठी ‘गोकुळ’ला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
भरमू पाटील म्हणाले, ‘गोकुळ’चा कारभार स्वच्छ आहे. संघाची धुरा महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी चांगली चालवली असून विरोधी आघाडी ही घबाड मिळण्यासाठी एकत्र आल्याने या रावणांचा पराभव केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही.
शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर यांनी स्वागत करून सत्ताधारी पॅनलला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.
प्रास्ताविकात बाळासाहेब कुपेकर यांनी आपल्यावर विरोधी आघाडीकडून अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. ठरावधारकांची संख्या अगदी नगण्य असलेल्या आणि पालकमंत्र्यांचे दत्तकपुत्र असलेले गुरबे व ग्रामपंचायतीमध्ये पराभव झालेल्या महाबळेश्वर चौगुले यांना तालुक्यातून उमेदवारी मिळाली याची खंत झाल्यानेच आमच्या गटाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी बी. एम. पाटील-वाघरालीकर, कृष्णराव वाइंगडे, तानाजी पाटील, भरमाण्णा गावडा व उमेदवार प्रकाश चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सदानंद हत्तरगी, सम्राट महाडिक, रणजितसिंह पाटील-मुरगूडकर, वसंतराव नंदनवाडे, आनंदराव मटकर, दिगंबर देसाई, आनंदराव देसाई, उदय देसाई, बबन देसाई आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
गोकुळ संदर्भात कानडेवाडी येथे झालेल्या कुपेकर गटाच्या पाठिंबा मेळाव्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे स्वागत करताना संग्रामसिंह कुपेकर. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, बाळासाहेब कुपेकर, भैयासाहेब कुपेकर, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, कृष्णराव वाईंगडे, बी. एम. पाटील, भरमाण्णा गावडा, तानाजी पाटील व दिगंबर देसाई आदी उपस्थित होते.