पालकमंत्री सतेज पाटील यांचे सलाम कोल्हापूरकर अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:56+5:302021-06-24T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाकाळामध्ये लोकांच्या मदतीसाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाकाळामध्ये लोकांच्या मदतीसाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘सलाम कोल्हापूरकर’ हे अभियान राबविले आहे. यानिमित्ताने संकट काळामध्ये मदतीसाठी सदैव तत्पर असणारे सर्वसामान्य कोल्हापूरकर प्रथमच होर्डिंगवर झळकले आहेत. या अभियानाची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेवेळी पालकमंत्री पाटील यांनी सर्व कोरोना फ्रंटलाइन वर्कर्सचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’ हे अभियान राबविले होते.
या अभियानाबद्दल पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर गेले जवळपास १५ महिने कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटाशी लढत आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस, फ्रंटलाइन वर्कर, प्रशासन तर या संकटाचा मुकाबला करीत आहेतच, पण यांच्या सोबतीने कोल्हापुरातील काही सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवा पिढीसुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजाला मदत करीत आहेत. पडद्यामागे राहणारे हे जनसामान्य हे खरे या संकटकाळातील हीरो आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सुरू राहीलच; पण या सगळ्या कोल्हापूरकरांना सलाम करायलाच हवा. त्यासाठीच सलाम कोल्हापूरकर हा विनम्र प्रयत्न आहे. कोरोनाच्या या लढ्यात आपला वाटा उचलणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात कोल्हापूरकरांना मनापासून सलाम आहे. आपल्या आजूबाजूला असे पडद्यामागे राबणारे हात असतील तर त्यांचे कौतुक जरूर करा. आपले हे कृतज्ञतेचे शब्द या सर्वांना बळ देतील. आपण सगळे मिळून ही लढाई जिंकूया.
यांना केला सलाम...
या अभियानामध्ये, व्हाइट आर्मी, सीपीआर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना स्वतःच्या पॉकेटमनीमधून नाश्ता देणारी अर्पिता राऊत, आचल कट्यारे, श्रेया चौगुले, श्रुती चौगले या चार युवती, शववाहिका चालक प्रिया पाटील, युवासेवक झाउंडेशन, कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल कमिटी, हंगर हेल्पर ग्रुप, मनस्पंदन फौउंडेशन, कोल्हापूर वुई केअर - एनजीओ कम्पॅशन 24, भास्कर भोसले, मिलिंद यादव, अमोल बुड्ढे, कल्पना भाटिया, रिक्षाचालक जितेंद्र शिंदे, हर्षल सुर्वे, साक्षी पन्हाळकर, दीपा शिपूरकर, सारिका बकरे, ऐश्वर्य मुनीश्वर, संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, अवधूत भाट्ये, रोटरी मूव्हमेंट ऑफ कोल्हापूर, क्रेडाई कोल्हापूर आणि फोर्टी वनर्स क्लब ऑफ कोल्हापूर, उत्तरेश्वर थाळी या स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
फोटो : २३०६२०२१-कोल-सलाम कोल्हापूरकर