पालकमंत्र्यांनी स्वत:ची राजकीय उंची तपासावी- जयवंत शिंपी, मुकुंद देसाई यांचे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:04 AM2018-05-03T01:04:40+5:302018-05-03T01:04:40+5:30
आजरा : २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांनी वेळ व पैसा घालवू नये म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैशाशिवाय निवडणुका केल्याच नाहीत.
आजरा : २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांनी वेळ व पैसा घालवू नये म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैशाशिवाय निवडणुका केल्याच नाहीत. तसेच डॉ. डी. वाय. पाटील यांनी कर्तृत्वाने उभे केलेल्या साम्राज्यावर टीका करण्यापेक्षा मंत्री पाटील यांनी स्वत:ची राजकीय उंची तपासावी, असा टोला आजरा येथील राष्ट्रवादी, काँगे्रस व शिवसेना आघाडीचे प्रमुख जयवंत शिंपी,
जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष विद्याधर गुरबे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत हाणला.
आजरा शहर विकास आघाडीने विजयी मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात पालकमंत्री पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत मंत्री पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावरही जोरदार टीका केली. यावेळी गुरबे म्हणाले, मंत्री पाटील हे प्रतिमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यात तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून कोणते प्रोजेक्ट आणले? शेतकºयांसाठी एखादी योजना आणली का? तसेच गरीब मुलांसाठी एखादी शैक्षणिक संस्था काढली नसल्याने त्यांना पाटील घराण्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
शिंपी म्हणाले, तिसºया आघाडीमुळे आमचा पराभव झाला. शहर विकास आघाडीने गेल्या पाच वर्षांत सर्व योजनांचा बोजवारा केला आहे. राजकीय चालीत कमी पडलो असलो तरी यापुढे चुका दुरुस्त करून वाटचाल करणार आहे.
मुकुंदराव देसाई म्हणाले, आमच्या नेत्यावर टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा मंत्री पाटील यांनी विजयी मेळाव्यात निधी जाहीर करणे अपेक्षित होते. आमचा चांगल्या कामाला पाठिंबा, तर चुकीच्या कामांना विरोध राहील, असे स्पष्ट केले. याप्रसंगी काँगे्रसच्या महिला जिल्हाध्यक्षा अंजनाताई रेडेकर, तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, सुधीर देसाई, नगरसेवक संभाजी पाटील, रवी भाटले, आदी उपस्थित होते.
महाडिकांनी सोयीचे पक्षीय लेबल थांबवावे
काँगे्रसच्या जिवावर दोनवेळा आमदार झालेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रत्येक पक्षाच्या सोयीचे लेबल लावणे थांबवावे. तसेच सोयीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या बाबतीत बोलावे, असा टोला मारून निवडणुकीत सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे गुरबे यांनी सांगितले.