पालकमंत्र्यांचा मदतीचा हात
By admin | Published: January 5, 2017 12:38 AM2017-01-05T00:38:05+5:302017-01-05T00:38:05+5:30
होतकरू तरुणांना रोजगार : सँडविच देऊन निमंत्रितांचे स्वागत
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथील महादेव कडूकर आणि भुदरगड तालुक्यातील मोहन मेणे या दोन होतकरू तरुणांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीने आपल्या सँडविच सेंटरला सुरुवात केली. मंत्री पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी सॅँडविच देऊन निमंत्रितांचे स्वागत करीत यजमानांची भूमिका पार पाडली.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, प्रत्येक माणसाने एका तरी युवकाला स्वत:चा रोजगार निर्माण करून पायावर उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. जीवनात प्रत्येकाने एक झाड जगवावे, एक प्राणी जगवावा, एका मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करावी, एखाद्या वृद्धाचे संगोपन करावे. आपल्या वाढदिवसादिवशी ३५ हजार रोपे जमवून कोल्हापुरात रस्ते सौंदर्यीकरणाचा उपक्रम हाती घेतला. त्यातून आज शहराचे संपूर्ण रुपडे पालटले आहे. अशाच पद्धतीने ‘सावली’ या ८० खोल्यांच्या वृद्धाश्रमाचीही उभारणी होत आहे.
उद्घाटनासाठी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, संपतबापू पवार, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, आर. एस. पाटील, मधुरिमाराजे, माजी महापौर सुनील कदम, विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, बाबा देसाई, संदीप देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, किरण नकाते, राहुल चव्हाण, स्मिता माने उपस्थित होते.
महादेव कडूकर व मोहन मेणे या युवकांना सहकार्य करून त्यांच्या सेंटरवरील सॅँडविच ग्राहकांना देत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी अंजली पाटील, राहुल चिकोडे उपस्थित होते.