अधिकाऱ्याने स्वीकारले अनाथ तनिष्काचे पालकत्व
By admin | Published: November 17, 2015 12:42 AM2015-11-17T00:42:00+5:302015-11-17T00:44:55+5:30
--गुड न्यूज--इंग्रजी शाळेत लोअर के.जी.मध्ये शिकत असून, तिला उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न कक्ष अधिकारी बाजीराव पाटील पूर्ण करणार
नंदकुमार ढेरे -- चंदगड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बाजीराव धोंडिबा पाटील यांनी आरोग्य सेवा बजावत असताना चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आरोग्यसेविका कविता सदानंद देसाई (रा. चंदगड) यांची कन्या तनिष्का देसाई हिचे पालकत्व स्वीकारून उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली असून, तिच्या शिक्षण व विवाहासाठी विविध शासकीय योजना व विम्यासह रुपये ६ लाखांचे सुरक्षा कवचही उपलब्ध करून दिल्याने मातेच्या आकस्मिक मृत्यूने निराधार बनलेल्या तनिष्का हिला पाटील यांच्या सहकार्यामुळे मोठा आधार मिळाला आहे.चंदगड तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या कविता देसाई हिचे धनगरवाडा (नगरगाव) येथील आरोग्य शिबिर आटोपून परतत असताना तिलारी घाटात झालेल्या अपघातात निधन झाले. या अपघातात वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण ५ जि.प. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.कविता हिला तनिष्का ही एकुलती कन्या असून, तिच्यावर अतिशय प्रेम होते. तनिष्का सध्या चंदगड येथील स्टेफिन इंग्रजी शाळेत लोअर के.जी.मध्ये शिकत असून, तिला उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न कक्ष अधिकारी बाजीराव पाटील पूर्ण करणार असल्याने तनिष्काला मोठे पाठबळ मिळाले आहे.
मृत्यूपूर्वी काही क्षण अगोदर मृत्यूची चाहुल लागलेल्या कविता हिने ‘मी आता जगू शकत नाही, कृपा करून माझ्या मुलीला सांभाळा व शिकवा’ अशी आर्त हाक देऊन कविताने जगाचा निरोप घेतला. खऱ्या अर्थाने तिच्या आर्त हाकेला बाजीराव पाटील यांनी ‘ओ’ देऊन माणुसकी जपून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.पाटील यांनी पर्यावरणपूरक फाटकेमुक्त व साधेपणाने दिवाळी साजरी केली. शिवाय आपल्या बहिणीला भाऊबीज भेट न देता ती तनिष्काच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिली. पाटील यांनी दिवाळीत तनिष्काचे घरी भेट देऊन तिला कपडे, फराळ, मिठाई बरोबरच शासनाचे किसान विकासपत्र, कन्या समृद्धी योजना व विमा असे एकूण ६ लाखांचे सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले असून, सदरची रक्कम तिला २१ वर्षांनंतर मिळणार असलेने तिच्या विवाहाच्या व उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे.यावेळी तनिष्काचे वडील सदानंद देसाई उपस्थित होते.