‘स्वयंम्’च्या २५ मुलांचे पालकत्व दातृत्वाचा ओघ : ‘लोकमत’मधील वृत्तानंतर भरभरुन प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:06 AM2018-07-13T01:06:16+5:302018-07-13T01:07:20+5:30

गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ‘स्वयंम्’ या विशेष मुलांच्या शाळेतील २५ गतिमंद मुलांचे एका वर्षासाठीचे पालकत्व समाजातील

 Guardianship of 25 children of 'Swayam': Obligation response after a 'Lokmat' report | ‘स्वयंम्’च्या २५ मुलांचे पालकत्व दातृत्वाचा ओघ : ‘लोकमत’मधील वृत्तानंतर भरभरुन प्रतिसाद

‘स्वयंम्’च्या २५ मुलांचे पालकत्व दातृत्वाचा ओघ : ‘लोकमत’मधील वृत्तानंतर भरभरुन प्रतिसाद

googlenewsNext

कोल्हापूर : गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ‘स्वयंम्’ या विशेष मुलांच्या शाळेतील २५ गतिमंद मुलांचे एका वर्षासाठीचे पालकत्व समाजातील दानशूरांनी स्वीकारले आहे. ‘लोकमत’ मध्ये त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाले होते व समाजाच्या दातृत्वाला आवाहन करण्यात आले होते. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

कसबा बावड्यातील न्याय संकुलाच्या मागील बाजूस इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने स्वयंम् विशेष गतिमंद मुलांची शाळा चालवली जाते. येथे सध्या १४५ मुले-मुली शिक्षण घेत असून या शाळेला केवळ ४० विद्यार्थ्यांसाठी अनुदान दिले जाते. उर्वरित १०४ विद्यार्थ्यांचा खर्चाचा डोलारा दानशूर व पदाधिकाºयांच्या मदतीवर सांभाळला जातोय; मात्र वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे व्यवस्थापनाला शाळेचा खर्च भागवणे अवघड जात आहे; त्यामुळे शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली असून याद्वारे दानशूर व्यक्तीने केवळ पाच हजार रुपये भरून एका विद्यार्थ्याचे एका वर्षासाठीचे आर्थिक पालकत्व स्वीकारायचे आहे. याबाबतचे वृत्त २५ जूनला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले.

‘लोकमत’ने आणि संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याचदिवशी कोल्हापुरातील आठ दानशूर व्यक्ती व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवला. गेल्या पंधरा दिवसांत अनेक नागरिकांनी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना, रोटरी क्लबचे पदाधिकारी, तरुणांचे ग्रुप, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाळेला भेट देऊन अर्थसाहाय्य केले आहे. अशारितीने जवळ २५ मुलांसाठीचे अर्थसाहाय्य संस्थेला मिळाले आहे. अजूनही नागरिकांकडून या योजनेची विचारणा होते, शाळेची माहिती घेऊन आम्ही शक्य तितकी मदत करून अशी ग्वाही येत आहे. शिवाय कुटुंबीयांचे वाढदिवस, लहान-मोठे कार्यक्रम विद्यार्थ्यांसमवेत करण्याचीही इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

निखळ मैत्री परिवाराचा पुढाकार
‘लोकमत’मधील बातमी वाचून निखळ मैत्री परिवार या ग्रुपने ‘लोकमत’शी संपर्क साधून शाळेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रुपमधील सदस्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन तेथील काम पाहिले. शाळेला अधिकाधिक अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी या संस्थेच्यावतीने शाळेवर विशेष व्हिडिओ तयार केला आहे. तो फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहे. त्याद्वारे अनेक दानशूर व्यक्ती शाळेशी जोडल्या जाणार आहेत. या संस्थेचा सोमवारी (दि. १६) शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहा वाजता गाण्याचा कार्यक्रम असून, त्यादिवशी ग्रूपमधील सदस्यांकडून तीन ते चार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. सरदार पाटील, किरण रणदिवे, मनोज सोरप, विजय तांबे, दिलीप अहुजा हे या ग्रूपचे अ‍ॅडमिन आहेत. ज्या दानशूर व्यक्तींना शाळेला मदत करायची आहे, ते या कार्यक्रमास हजर राहून मदतनिधी देऊ शकतात.
 

गतिमंद मुलांच्या मदतीसाठी ‘लोकमत’ने आवाहन केले त्यामुळे अनेक दानशूर व्यक्ती संस्थेशी जोडले गेले आहेत. २५ गतिमंद मुलांंसाठी अर्थसाहाय्य मिळाले आहे. याबद्दल संस्थेच्यावतीने आम्ही ‘लोकमत’चे खूप आभारी आहे.
- अमरदीप पाटील, उपाध्यक्ष इंडियन रेडक्रॉस सोसायटी

Web Title:  Guardianship of 25 children of 'Swayam': Obligation response after a 'Lokmat' report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.