निराधार निकिताचे महाडिकांकडून पालकत्व
By admin | Published: June 21, 2016 01:00 AM2016-06-21T01:00:27+5:302016-06-21T01:15:57+5:30
आत्महत्याग्रस्त पल्लवीची बहीण : शिक्षणासह सर्व सुखसोयींचा खर्च उचलणार
कोल्हापूर : लहान वयात मातेचा आधार हरपलेल्या आणि पोरक्या बनलेल्या बोंद्रेनगर येथील निकिता गणपत बोडेकर या मुलीचे ‘पालकत्व’ महाडिक उद्योगसमूहाने स्वीकारले आहे. निकिताचे जीवन सुखकर करण्यासाठी पालकत्वाच्या भूमिकेतून महाडिक उद्योगसमूह सर्वतोपरी मदत करणार असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले.
फुलेवाडी रिंग रोड परिसरातील बोंद्रेनगर येथील पल्लवी गणपत बोडेकर या मुलीने रविवारी (दि. १९) छेडछाडीच्या त्रासातून गळफास घेऊन आत्महत्या केली. लहानपणीच आई-वडिलांचे छत हरपलेल्या आत्महत्याग्रस्त तरुणीच्या पश्चात एक धाकटी बहीण आणि आजारी आजी आहे. एकमेव आधार असणाऱ्या कमवत्या बहिणीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने लहान बहीण निकिता बोडेकर पोरकी झाली आहे. ती सध्या १२ वीच्या वर्गात शिकत आहे. सामाजिक बांधीलकीतून तिच्या पालकत्वाची संपूर्ण जबाबदारी महाडिक उद्योगसमूहाने स्वीकारली आहे. त्याशिवाय तिला यूथ को-आॅप. बँकेत नोकरी आणि तिच्या विवाहाचा संपूर्ण खर्चही महाडिक समूहातर्फे करण्यात येणार आहे. एकूणच, शिक्षण आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात निराधार बनलेल्या निकिताचे भावी जीवन सुखी करण्यासाठी महाडिक समूह मदत करणार आहे.
पल्लवीच्या घरी विविध मान्यवरांच्या भेटी
फुलेवाडी : परिसरातील तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या कलेल्या पल्लवीवर तणावपूर्ण वातावरणातच सोमवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभर बोंद्रेनगर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांचा फौज फाटा धनगर वसाहतीत तैनात होता. झालेल्या घटनेची माहिती समजताच अनेक मान्यवरांनी तसेच सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पल्लवीची लहान बहीण निकीताची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल माने हे किशोर माने आणि राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांसह याठिकाणी आले महापौर अश्विनी रामाने, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, नगरसेविका रीना कांबळे, सारंग देशमुख, दलित महासंघाचे व्यंकप्पा भोसले, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह उर्फ रिंकू देसाई आदी मान्यवर भेट देऊन गेले.