मुूहूर्तावर ८७०४ विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशाची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:08+5:302021-04-14T04:23:08+5:30
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ८७०४ विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली. ...
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ८७०४ विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून ऑफलाइन, ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. काही शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी गुढीपाडव्याच्या दिनी मंगळवारी कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, आदी नियमांचे पालन करून शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. पालकांकडून प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले. काही शाळांमध्ये पालकांसमवेत आलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते पाटीपूजन करण्यात आले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १९७७, तर शहरामध्ये महापालिकेच्या ५८ शाळा आहेत. या शाळांमध्ये सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेशासाठी पालक येत होते. दिवसभरात एकूण ८७०४ विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिलीचे प्रवेश निश्चित झाले. त्यात शहरातील ८७० विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यात जरगनगर येथील ल. कृ. जरग विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे आहे. इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्येही पालकांनी उपस्थिती दिसून आली.
प्रतिक्रिया
महापालिका शाळांमध्ये गुढीपाडव्यादिवशी एकूण ८७० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. जूनपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
-एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी केलेल्या पूर्वतयारीनुसार ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
चौकट
सहा तालुक्यातील ७८३४ विद्यार्थी
कोरोनाच्या नियमांचे पालन करून जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. सायंकाळी साडेसहापर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार एकूण ७८३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यात आजरा (४८५), भुदरगड (१३५६), चंदगड (१८६६), गडहिंग्लज (१३४९), गगनबावडा (५०९), कागल (२२६९) या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अन्य तालुक्यांतील आकडेवारी गुरुवारी प्राप्त होईल, असे जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाचे समन्वयक बी. बी. पाटील यांनी सांगितले.