गुढीपाडवा पर्यावरणपूरक, महिलांनी तयार केली बीटापासून साखरेची माळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:47+5:302021-04-10T04:23:47+5:30
कोल्हापूर : येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे यावर्षी पर्यावरणपूरक गुढीपाडवा साजरा करण्याचे नियोेजन करण्यात आले आहे. गुढीला बांधण्यासाठी लागणारी साखरेची माळही ...
कोल्हापूर : येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे यावर्षी पर्यावरणपूरक गुढीपाडवा साजरा करण्याचे नियोेजन करण्यात आले आहे. गुढीला बांधण्यासाठी लागणारी साखरेची माळही बीट, हळद, शेंद्री, पुदीना, पालक इत्यादी वनस्पतींच्या रंगांपासून आदर्श सहेली मंच या महिला मंडळाने तयार केली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गुढीपाडव्यानिमित्त संस्थेतर्फे बहुगुणी कडुलिंब व गूळवेलची रोपे दत्तक देण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षानिमित्त यावर्षी पर्यावरणपूरक गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आदर्श सहेली मंच या महिला मंडळाने बीट, हळद, शेंद्री, पुदिना, पालक इत्यादी वनस्पतींच्या रंगांपासून गुढीला बांधण्यासाठी लागणारी साखरेची माळ तयार केली आहे. या माळा निसर्गमित्र संस्थेतर्फे निसर्गप्रेमींच्या आगाऊ मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
धान्यामध्ये टाकण्यासाठी कडुलिंबाच्या निर्माल्यापासून गोळ्या
गुढीपाडवा झाल्यानंतर कडुलिंबांचे ढाळे लोकसहभागातून संस्थेकडे जमा करावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे. या कडुलिंबाच्या निर्माल्यापासून सौरऊर्जा वाळवणी यंत्राचा वापर करून त्याची पावडर तयार केली जाणार आहे. त्या पावडरपासून साठवणुकीचे धान्य किडू नये म्हणून धान्यामध्ये टाकण्यासाठी गोळ्या तयार करून त्या ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वानुसार देणगी शुल्कामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
बहुगुणी कडुलिंब व गूळवेलची रोपे दत्तक देणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गुढीपाडव्यानिमित्त संस्थेतर्फे बहुगुणी कडुलिंब व गूळवेलची रोपे दत्तक देण्यात येणार आहेत. निसर्गप्रेमींनी ही रोपे एक वर्ष दत्तक घेऊन त्यांचे जतन करून ती पुढच्या वर्षी मोकळ्या जागी लावण्याकरिता संस्थेकडे परत करावयाची आहेत. यामुळे हवा,ध्वनिप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. हे वृक्ष मोकळ्या जागेत लावल्यानंतर त्याची जोमाने वाढ होईल व तापमानवाढ रोखण्यास हातभार लागेल. अधिक माहितीसाठी निसर्ग मित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांच्याशी २८२३/४८, बी वाॅर्ड, महालक्ष्मीनगर, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------------------
फोटो : 09042021-kol-sugerbeat
फोटोओळ : बीटापासून तयार केलेली साखरेची माळ.
(संदीप आडनाईक)
===Photopath===
090421\09kol_1_09042021_5.jpg
===Caption===
फोटो : 09042021-kol-sugerbeatफोटोओळ : बीटापासून तयार केलेली साखरेची माळ.