लाॅकडाऊनमुळे वाहन विक्रीचा गुढीपाडव्याचा मुहूर्तही संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:09+5:302021-04-08T04:24:09+5:30
शिरोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या निर्बंधांमुळे गुढी पाडव्याला होणारी वाहन विक्री यंदाही संकटात सापडली असून कोट्यवधी रुपयांच्या ...
शिरोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या निर्बंधांमुळे गुढी पाडव्याला होणारी वाहन विक्री यंदाही संकटात सापडली असून कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला ब्रेक लागण्याची भीती आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. अनेक नागरिक या दिवशीच्या मुहूर्ताला गाडी घेतात, वर्षातील गाड्यांची एकूण विक्रीपैकी २५ टक्के विक्री गुढी पाडव्याला होते; पण गेल्यावर्षी लाॅकडाऊनमुळे गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया हे दोन मुहूर्त चुकले. गाड्यांची विक्री झाली नाही. यंदा १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. पण राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारची चिंता वाढविली आहे.यामुळे राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. पण राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाची नियमावली यात साम्य नसल्याने सांगली, सातारा जिल्ह्यांतील चारचाकी गाड्यांचे शोरूम जवळपास बंद झाले आहेत तर कोल्हापूरमध्ये ही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल उद्योग संकटात सापडला आहे. या मुहूर्तावर होणारी वाहन विक्री थांबली तर होणारे नुकसान नंतरच्या काळात भरुन येण्याची शक्यता कमीच आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गुढी पाडव्याला सुमारे तीन हजारांहून अधिक चारचाकी व सात हजारांहून अधिक दुचाकी गाड्यांची विक्री होते. पण कोरोनामुळे यावर्षीही ही विक्री थांबण्याची भीती आहे.
कोट :
कोरोनामुळे गेल्यावर्षी चार मुहूर्त चुकले होते. यंदाही कोरोनाचे सावट आहेत. यामुळे वाहन विक्रीवर परिणाम होणार आहे. वर्षातील एकूण विक्रीपैकी सुमारे २५ टक्के विक्री घटणार आहे.
(उदय लोखंडे, ट्रेन्डी व्हील -)
पश्चिम महाराष्ट्रातील चारचाकी गाड्यांचे शोरूम जवळपास बंद झाली आहेत. कोल्हापूरमधील शोरूम्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला होणारी वाहन विक्री यंदा ही संकटात सापडली आहे.(विशाल चोरडीया, युनिक ऑटोमोबाईल)