गुऱ्हाळ व्यावसायिकांनी संघटित लढा द्यावा
By admin | Published: October 25, 2015 11:18 PM2015-10-25T23:18:04+5:302015-10-25T23:35:12+5:30
राजू शेट्टी यांचे आवाहन : शाहू गूळ संघाचा मेळावा
वडणगे : गुऱ्हाळ व्यावसायिकांपुढील समस्या सोडविण्यासाठी सरकारने आतापर्यंत दुर्लक्ष केलेले आहे, म्हणूनच यापुढे शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
आंबेवाडी (ता. करवीर) येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शाहू गूळ संघाच्यावतीने गूळ उद्योग अडचणी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, गूळ क्लस्टर मंजुरी, निर्यातीसंदर्भात ‘अपेडा’ची मदत मिळवणे, गूळ बोर्ड स्थापन करणे, गूळ पदार्थांच्या मार्केटिंगसाठी आपण प्रयत्नशील राहू, तसेच शाहू गूळ संघाच्या ‘उत्पादक ते ग्राहक’ अभियानास मदत आणि आंदोलनात पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
आ. चंद्रदीप नरके यांनी गूळ उद्योगाच्या समस्यांबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. प्रा. जालंदर पाटील यांनी दर्जेदार उत्पादन करून बाजारपेठा काबीज करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला ताकद द्यावी, असे मनोगत व्यक्त केले.
फिनोलेक्सचे अधिकारी विठ्ठल गोरे यांनी ठिबक सिंचन तसेच खेबवडेचे अरुण पाटील यांनी सेंद्रीय शेती या विषयांवर उपस्थितांचे मनोबल उंचावले. प्रास्ताविक शाहू संघाचे संस्थापक राजाराम पाटील यांनी गूळ उद्योगाच्या समस्या व उपाय याचा आढावा घेतला.
यावेळी भुयेवाडीच्या राणी पाटील, संघाचे संचालक संभाजी देवणे (वडणगे), बळीराम चव्हाण (कोगे), विलास देसाई (चिंचवडे), कावजी कदम (उचगाव), सुरेश कुरणे (आंबेवाडी), आण्णासाहेब पाटील (चिंचवाड), रामचंद्र कचरे (वडणगे), नामदेव पाटील (वरणगे), तसेच गुऱ्हाळ व्यावसायिक उपस्थित होते. व्हा. चेअरमन रघुनाथ वरूटे यांनी आभार मानले. (वार्ताहर)